Maratha Kranti Mocha: उपनगरांत कडकडीत ‘बंद’

मुंढवा - महात्मा फुले चौकात ठिय्या आंदोलन करताना अखिल मुंढवा-केशवनगर मराठा समाजाचे तरुण.
मुंढवा - महात्मा फुले चौकात ठिय्या आंदोलन करताना अखिल मुंढवा-केशवनगर मराठा समाजाचे तरुण.

सकल मराठा समाजाने आरक्षणासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाला उपनगरांमधील व्यापाऱ्यांसह विविध संस्था व संघटनांनी पाठिंबा दिला. नागरिकांसह कार्यकर्त्यांनीही शांतता राखली. त्यामुळे अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्वत्र शुकशुकाट होता. पोलिस बंदोबस्त असल्यामुळे चांदणी चौकातील घटनेचा अपवाद वगळता उपनगरांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

मुंढवा - सकल मराठा समाजाने आपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरून, महाराष्ट्र बंद पुकारण्याची हाक दिली. या हाकेला साद देत उपनगरामध्ये व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपले व्यवसाय बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

मुंढवा-केशवनगर, कोरेगाव पार्क, खराडी, घोरपडीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. या भागातील पेट्रोल पंप, बॅंका, पीएमपी सेवा, रिक्षा, शाळा, सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मात्र दवाखाने, मेडिकल्स यांना बंदमधून वगळण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

अखिल मुंढवा-केशवनगर मराठा समाजाच्या वतीने, मराठा समाजाला आरक्षण मिळावे व ज्या आंदोलकांवर सरकारने गुन्हे दाखल केले ते मागे घ्यावेत, या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाने पदयात्रेचे आयोजन केले होते. तरुण हातात भगवे झेंडे घेऊन घोषणा देत पदयात्रेत सहभागी झाले होते. लोणकर वस्ती, शिंदे वस्ती, शिवाजी चौक, बधे वस्ती, मुंढवा गावठाण, गांधी चौक, महात्मा फुले चौक अशी पदयात्रा काढल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ठिय्या आंदोलन करण्यात आले. पदयात्रेत सुमारे बाराशे तरुणांनी व नागरिकांनी शांततापूर्ण मोर्चात सहभाग घेतला. 

मराठा समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मोर्चाचे वादळ सुरूच राहील, असे मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी सांगितले. या वेळी मराठा समाजाच्या तरुणांनी सरकारवर आरक्षण देण्याविषयी आगपाखड केली.

मोर्चासाठी मुंढवा पोलिस स्टेशनचे दोन पोलिस निरीक्षक, सात उपनिरीक्षक व सत्तर कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. कुठेही अनुचित प्रकार घडला नसून मोर्चा शांततेत पार पडल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल पात्रूडकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com