Martha Kranti Morcha: पुणे जिल्ह्यात कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 August 2018

पुणे - सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी क्रांती दिनी गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळाला. काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्ह्यातील मुस्लिम आणि जैन समाजाने पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला.

पुणे - सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी क्रांती दिनी गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळाला. काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्ह्यातील मुस्लिम आणि जैन समाजाने पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला.

बंदबाबत खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून सकाळी नऊपासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. यामुळे जिल्ह्यात दिवसभर व्हॉट्‌सॲप, फेसबुक या समाजमाध्यमांच्या वापरावर निर्बंध आले होते. सायंकाळी सहा वाजता इंटरनेट सेवा पूर्ववत झाली. दिवसभर मोर्चे, रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन आदी मार्गांनी आंदोलकांनी मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी केली. 

बंदच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि आठवडे बाजार बंद ठेवण्यात आले होते. या बंदमधून रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, मेडिकल दुकाने आणि पेट्रोल पंप आदींसह सर्व अत्यावश्‍यक सेवांना वगळण्यात आले होते. पोलिसांनी जिल्ह्यात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता.

जिल्ह्यातील टोल नाक्‍यांवर शांतता पसरली होती. एरव्ही गजबजणारी शहरे, गावे आज स्तब्ध झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. बारामतीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, भोरमध्ये आमदार संग्राम थोपटे, खेडमध्ये आमदार सुरेश गोरे, कोरेगाव भीमामध्ये आमदार बाबूराव पाचर्णे, मंचरमध्ये माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनीही आंदोलनात सहभाग घेतला. बारामतीत गोविंदबागेसमोर झालेल्या आंदोलनात अजित पवार यांनीही घोषणाबाजी केली.

पुण्यात शुकशुकाट
पुणे - मराठा आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देत पुणेकरांनी गुरुवारी कडकडीत बंद पाळला. शहर व उपनगरांतील शाळा, महाविद्यालये बंद होती. सोन्या-चांदीच्या दुकानांसह कापड व्यावसायिक, तसेच घाऊक व किरकोळ दुकानदारांनीही उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवून महाराष्ट्र बंदला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे एरवी गजबजलेल्या रस्त्यांवर शुकशुकाट होता. मोकळ्या रस्त्यांवर नागरिकांचीही वर्दळ नव्हती. मात्र, अत्यावश्‍यक सेवा सुरू होत्या.
महात्मा फुले मंडईसमोरील नऊ ऑगस्ट क्रांती दिन चौक नेहमीच वेगवेगळ्या आंदोलनांमुळे चर्चेत असतो; परंतु गुरुवारी मात्र तेथे सकाळपासूनच नीरव शांतता होती.

लक्ष्मी रस्त्यावरील सराफी पेढ्या, कुमठेकर रस्त्यावरील कापड व्यावसायिकांनीदेखील स्वतःहून दुकाने बंद ठेवली होती. तुळशीबागेतील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनीसुद्धा पत्रक काढून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. बंदमुळे तुळशीबागेत मुले क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत होती. 

काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दुकानदारांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवणे पसंत केले. 

पिंपरीत १०० टक्के बंद
पिंपरी - सूर्योदयानंतरही बंद असलेली दुकाने, ओस पडलेले रस्ते, ना स्कूल बस ना विद्यार्थी, सारे काही शांत शांत. अशा वातावरणात शहरवासीयांना गुरुवारची सकाळ अनुभवायला मिळाली. मात्र, साडेआठ-नऊ नंतर वेगवेगळ्या भागांतून निघालेल्या दुचाकी रॅली; रावेत, किवळे, पिंपळे गुरव, हिंजवडीत झालेल्या सभा आणि भोसरी व पिंपरीत दिवसभर झालेले ठिय्या आंदोलन यामुळे मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेला ‘बंद’ शंभर टक्के यशस्वी झाला.

शहर परिसरातील व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक, सेवाभावी संस्था, शाळा, महाविद्यालयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘आज दूध की गाडी आयी नही’ अशा शब्दांत अनेकांच्या दिवसाची सुरवात झाली. दुकाने उघडलीच नाहीत. बहुतांश शाळा, महाविद्यालयांनी बुधवारीच गुरुवारची सुटी जाहीर केल्याने रस्त्यारस्त्यांवर दिसणाऱ्या स्कूलबस आणि विद्यार्थ्यांची वर्दळही नव्हती. त्यामुळे सारे वातावरण शांत शांत होते.

इंदापूर : सोलापूर महामार्गावर दोन तास ‘रास्ता रोको’
इंदापूर - सकल मराठा समाजाच्या वतीने इंदापूर बस स्थानक व पंचायत समितीसमोर जुन्या पुणे-सोलापूर महामार्गावर आज दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शहरात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. आंदोलनादरम्यान पुण्याकडून सोलापूरकडे निघालेल्या रुग्णवाहिकेस आंदोलनकर्त्यांनी तातडीने रस्ता देऊन समयसूचकता दाखविली. 

इंदापूर नगर परिषदेसमोर असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतिस्तंभास सुरवातीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शहरातून मोटार सायकल फेरी काढण्यात आली. बस स्थानकासमोर झालेल्या रास्ता रोको आंदोलनात तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, एसटी बस, संपूर्ण बाजारपेठ, सर्व व्यवहार बंद राहिल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले.

या वेळी मंगेश पाटील, अभिजित तांबिले, ॲड. मनोहर चौधरी, ॲड. भारत जगताप, कैलास कदम, गोरख शिंदे, शेखर पाटील, रमेश पाटील, गणेश बाबर पाटील, संजय शिंदे, डॉ. पंकज गोरे, अभिषेक साळुंखे, कल्पना भोर, जयश्री खबाले, समाधान देवकर यांची भाषणे झाली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. संदीप पखाले, तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांना निवेदन देण्यात आले. 

या वेळी डॉक्‍टर, नाभिक, वकील आणि माळी आदी संघटना, मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी मराठा आरक्षणास पाठिंबा दिला. साधू सरडे याने कांदलगाव, हिंगणगाव, सरडेवाडी असे १३ किलोमीटर अंतर सहकाऱ्यांसमवेत चालत आंदोलनास पाठिंबा दिला. तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजास तत्काळ आरक्षण द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. 

या वेळी महारुद्र पाटील, अरविंद वाघ, महेंद्र रेडके, रवी सरडे, बापूराव जामदार, बाळासाहेब मोरे, शरद देवकर, सुभाष बोंगाणे, डॉ. अभिजित ठोंबरे, अमर गाडे, हेमलता माळूंजकर, भगवान महाडिक, बाळासाहेब ढवळे, सुनील पिंपरे उपस्थित होते. प्रवीण पवार यांनी सूत्रसंचालन केले.

हवेली : पुणे-सातारा रस्त्यावर ठिय्या आंदोलन 
खेड-शिवापूर - पुणे-सातारा रस्त्यावर खेड-शिवापूर परिसरात गुरुवारी दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. भजन, ठिय्या आंदोलन, रास्ता रोको आणि रॅली काढून या भागातील नागरिक या बंदमध्ये सहभागी झाले होते.

गुरुवारी सकाळपासूनच खेड-शिवापूर परिसरातील व्यावसायिक आपले व्यवसाय बंद ठेवत या बंदमध्ये सहभागी झाले होते. शिंदेवाडी, वेळू, श्रीरामनगर, खेड-शिवापूर, कासुर्डी शिवापूर, आर्वी, कोंढणपूर या गावांतील सर्व दुकाने आणि व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. सकाळी नऊच्या सुमारास वेळू फाट्यावर मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र आले होते. या वेळी भजन करत अनोख्या पद्धतीने कार्यकर्ते या बंदमध्ये सहभागी झाले. सकाळी साडेअकराच्या सुमारास अनेक कार्यकर्ते खेड-शिवापूर पोलिस चौकीसमोर एकत्र आले. या वेळी पुणे-सातारा रस्त्यावर ठिय्या मांडत या कार्यकर्त्यांनी काही काळ रास्ता रोको केला. या वेळी पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी दाखल होत आंदोलनकर्त्यांना रस्त्यावरून बाजूला घेत शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले, तर अनेक कार्यकर्ते दुचाकीवर रॅली काढत या बंदमध्ये सहभागी झाले होते. शिवापूर आणि कासुर्डी फाटा येथे टायर पेटविण्यात आले. तर काही वेळ कोंढणपूर रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला. पुणे-सातारा रस्त्यावर गुरुवारी दिवसभर शुकशुकाट पाहायला मिळाला. या परिसरातील वैद्यकीय सेवा सुरळीत सुरू होती. 

खासगी वाहतूकही ठप्प
बंदचा परिणाम पुणे-सातारा रस्त्यावरील वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून आले. एरवी वाहनांच्या गर्दीने गजबजलेल्या पुणे-सातारा रस्त्यावर गुरुवारी शुकशुकाट पाहायला मिळाला. या रस्त्यावरील एसटी आणि पीएमपी वाहतूक तसेच खासगी वाहतूकही बंद होती.

आंबेगाव : १०३ गावांत व्यवहार ठप्प 
मंचर - आंबेगाव तालुक्‍यात अवसरी खुर्द, पिंपळगाव, वडगाव काशिंबेग, लांडेवाडी, एकलहरे, तांबडेमळा, गावडेवाडी, चांडोली खुर्द, शेवाळवाडी आदी गावांसह संपूर्ण तालुक्‍यातील १०३ गावांत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बंद पाळण्यात आला. 

अवसरी खुर्द येथे श्री भैरवनाथ मंदिरापासून मोर्चा काढण्यात आला. अग्रभागी पंचायत समिती सदस्य संतोष भोर, सरपंच सुनीता कराळे, उपसरपंच अनिल शिंदे, शरद शिंदे, आनंदराव शिंदे, डी. एम. शिंदे, नीलेश टेमकर, विकास भोर, राजेंद्र टेमकर, कल्याणराव शिंदे, श्‍याम टेमकर, प्रसाद कराळे, कल्याण टेमकर, संगीता शिंदे यांच्यासह आदी सहभागी झाले होते. त्यानंतर ग्रामपंचायती समोर झालेल्या निषेध सभेत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. लांडेवाडी येथे सरपंच अंकुश लांडे व ज्येष्ठ नेते बाबासाहेब आढळराव पाटील व पिंपळगाव येथे सरपंच संगीता पोखरकर, उपसरपंच धनेश पोखरकर, प्रभाकर बांगर, सुजाता पोखरकर, रशीद इनामदार यांच्या नेतृत्वाखाली बंद शांततेत झाला. 

मुळशी : पौड तहसीलसमोर ठिय्या आंदोलन
पौड - मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मुळशी तालुक्‍यात चांगला प्रतिसाद मिळाला. तालुक्‍यातील दुकाने, हॉटेल, पेट्रोल पंप, शाळा बंद झाल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले होते. पौडला तहसील कचेरीसमोर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. तथापि कोणताही अनुसूचित प्रकार न घडता सर्वपक्षीय बंद शांततेत झाला.                

सकाळीच व्यावसायिकांनी आपली दुकाने, टपऱ्या, हॉटेल, भाजीपाला बंद ठेवला होता. सुतारवाडी, अंबडवेट, गडदावणे आदी परिसरातील औद्योगिक कारखाने बंद होते. अनेकांनी कारखानदारांनी कामगारांना सुट्टी दिली होती. तालुक्‍यातील प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. अत्यावश्‍यक सेवा मात्र सुरळीतपणे चालू होती. बंदनिमित्त मुळशीतील वाहतूक पूर्णपणे बंद होती. पीएमपीएलच्या बस तसेच एसटी बस सेवा पूर्णपणे बंद होती. पुण्याहून कोकणात जाणारी एसटीसेवा बंद होती.

खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहनेही रस्त्यावर दिसत नव्हती. परिणामी काही अंशी वाहतूक व्यवस्था ठप्प होती. त्यामुळे सर्वसामान्यांची वाहतुकीची मोठी गैरसोय झाली होती. पौड-माले रस्ता, पौड गावात शुकशुकाट होता.

तथापि तहसीलदार सचिन डोंगरे, निवासी नायब तहसीलदार भगवान पाटील, पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक उद्धव खाडे, उपनिरीक्षक अनिरुद्ध गिजे, उपनिरीक्षक श्रीमती दुधभाते व पौड पोलिसांनी अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. तथापि पौडला सर्व पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसील कचेरीसमोर ठिय्या आंदोलन केले.

जुन्नर : नारायणगावच्या टोमॅटो बाजारात शुकशुकाट
नारायणगाव - सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला आज नारायणगाव परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नेहमी वाहतुकीची कोंडी असलेला व गजबजलेला येथील बस स्थानक परिसर, व्यापारी बाजारपेठ व टोमॅटो उपबाजार येथे बंदमुळे शुकशुकाट होता. बंदमुळे सर्व व्यवहार ठप्प होते.

सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली येथील बस स्थानक परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मराठा आरक्षणाची तातडीने कार्यवाही व्हावी, या प्रमुख मागणीसाठी सकल मराठा समाजाने आज महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नारायणगाव परिसरातील सर्व शाळांना आज सुटी देण्यात आली होती. पोलिस व सकल मराठा समाजाच्या आवाहनानुसार नारायणगाव व परिसरात बंद शांततेत झाला. पोलिसांनीही नारायणगाव व परिसरातील प्रमुख गावांत चोख बंदोबस्त ठेवला होता. नारायणगावसह परिसरातील गावांत ग्रामस्थांच्या बैठका घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन पोलिस करत होते. पुणे-नाशिक महामार्गावर पोलिस गस्त पथक तैनात करण्यात आले होते.

एसटी बससेवा बंद ठेवण्यात आल्याने बस स्थानकात शुकशुकाट होता. इंटरनेट सेवा आज दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. बंदला नारायणगाव, वारुळवाडी, मांजरवाडी, हिवरेतर्फे नारायणगाव, आर्वी, गुंजाळवाडी, येडगाव, पिंपळगावतर्फे नारायणगाव परिसरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. अत्यावश्‍यक सेवांना ‘बंद’मधून वगळण्यात आल्याने रुग्णालये व मेडिकल दुकाने सुरू होती.

खेड : चाकणला कडकडीत बंद; रस्ते सुने
चाकण - येथील चाकण शहर व परिसरात मराठा समाजातर्फे आयोजित केलेल्या आजच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रुग्णालय, वैद्यकीय मेडिकल आदी सुविधा वगळता सर्व दुकाने सकाळपासून कडकडीत बंद होती. रस्त्यावर तुरळक वाहतूक सुरू होती. ट्रक, बस, कंटेनर, ट्रेलर यांची वाहतूक नव्हती. त्यामुळे रस्ते सुने पडले होते. 

पोलिसांचा पुणे-नाशिक महामार्गावरील तळेगाव चौक, माणिक चौक या ठिकाणी मोठा बंदोबस्त होता. औद्योगिक वसाहतीतील कारखाने, कंपन्या बंद असल्याने औद्योगिक वसाहतीतील रस्ते ओस पडले होते. कामगारांना आज सुट्ट्या दिल्याने औद्योगिक वसाहतीत शुकशुकाट होता. शहर व परिसरातील गावांतील शाळा, विद्यालये बंद असल्याने गावातील वर्दळही थंडावली होती. पोलिसांची गस्त मात्र परिसरात सुरू होती. दरम्यान पोलिस निरीक्षक संतोष गिरिगोसावी तसेच पोलिसांची पथके परिस्थितीवर नजर ठेऊन होती. सकाळपासून चौकात तसेच इतर ठिकाणी पोलिसांच्या वतीने जमावांचे फोटो घेण्यात येत होते, तसेच चित्रीकरण करण्यात येत होते. महसूल विभागाचे चाकणचे मंडलाधिकारी बाबा साळुंके, तसेच इतर तलाठी तळेगाव चौकात बसून होते.

आंदोलनाचे पडसाद
    जिल्ह्यात सर्व शाळा, महाविद्यालये, एसटी व खासगी बससेवा बंद 
    जिल्ह्यात दिवसभर इंटरनेट सेवा बंद
    बाजारपेठा, बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प
    चाकणला कडकडीत बंद 
    खेड शिवापूर, पाटस टोल नाक्‍यांवर शुकशुकाट
    मंचरला मुस्लिम व जैन बांधवांकडून मोर्चाचे स्वागत 
    बारामतीत गोविंदबागेसमोर ठिय्या अजित पवार यांचा सहभाग 
    आमदारांनी राजीनामा न देण्याचे अजित पवार यांचे आवाहन 
    कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे महिलांचे भजन 
    इंदापुरात सोलापूर महामार्गावर दोन तास रास्ता रोको
    वडगाव निंबाळकरला तरुणांकडून सामुदायिक मुंडण 
    नारायणगावात टोमॅटो उत्पादकांना सुमारे दोन कोटींचा फटका 
    वरवंडमध्ये मुस्लिम तरुणांसह २०० जणांचे मुंडण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Martha Kranti Morcha maratha reservation agitation #MaharashtraBandh