esakal | Martha Kranti Morcha: अजित पवारांनी दिल्या घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती - गोविंदबागेसमोरील आंदोलनात सहभागी होत घोषणा देत झेंडा फडकविताना अजित पवार.

Martha Kranti Morcha: अजित पवारांनी दिल्या घोषणा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बारामती शहर - गोविंदबाग या शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर आयोजित आंदोलनात सहभागी होत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकांना धक्काच दिला. गोविंदबाग या निवासस्थानासमोर आंदोलन असल्याने नेमके काय घडणार याची अनेकांना उत्सुकता होती. माध्यमांसह राज्याचे लक्ष या ठिकाणी होते. मात्र, अजित पवार भल्यापहाटेच पुण्याहून निघाले आणि सकाळी आठ वाजताच गोविंदबाग येथे पोचले. 

प्रथम सहयोग या आपल्या निवासस्थानासमोर आंदोलन होणार अशी मला माहिती मिळाली होती, माझ्या घरासमोर आंदोलन होणार असल्याने त्यात सहभागी होण्यासाठी मी आलो होतो; मात्र पवारसाहेबांच्या घरासमोर आंदोलन स्थळ असल्याचे समजल्यावर मी येथे आलो, असे अजित पवार यांनीच नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

सव्वादहाच्या सुमारास अजित पवार आंदोलनस्थळी आले. इतर कार्यकर्त्यांप्रमाणेच रस्त्यावर मांडी घालून बसले. कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर उभे राहत त्यांनी माइकवरून ‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं नाय कुणाच्या बापाचं...’, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणा दिल्या. मराठा समाजातील मुलींनी दिलेले निवेदन स्वीकारत आंदोलनाला आपलाही पाठिंबा असल्याचे सांगत ते बाहेर पडले. खुद्द अजित पवार आंदोलनात सहभागी होणार याची कल्पना मोजक्‍याच लोकांना होती. मात्र, कार्यकर्त्यांच्या मांडीला मांडी लावून रस्त्यावर बसत अजित पवार यांनी आपला पाठिंबा दाखवून दिल्याचीच चर्चा नंतर शहरात होती.