#MarathaKrantiMorcha आंदोलनामुळे नाशिक रस्ता ७ तास ठप्प

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 31 July 2018

मंचर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. ३०) खेड तालुक्‍यातील राजगुरुनगर व चाकण येथे पाळण्यात आलेल्या ‘बंद’चा परिणाम मंचर (ता. आंबेगाव) येथे जाणवला. नाशिकहून पुण्याला जाणारी वाहतूक सुमारे ७ तास ठप्प होती. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे व मुंबईला जाणाऱ्या ४० एसटी गाड्या मंचर बसस्थानकावर उभ्या होत्या. त्यामुळे सकाळपासून प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

संगमनेर, नाशिक, शिर्डी, धुळे, साकरी, भीमाशंकर, सुरत, इंदोर या दूरवरच्या भागातून पुण्याला जाणाऱ्या एसटी गाड्यांची संख्या जवळपास २०० आहे. राजगुरुनगर व चाकण येथील ‘बंद’ची परिस्थिती लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पुणे, कोल्हापूर, बेळगाव, पंढरपूर, बारामती व मुंबईला जाणाऱ्या एसटी गाड्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून मंचरला गाड्या थांबून ठेवल्या आहेत. खासगी बसही थांबून ठेवल्या. लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले. 

पुणे-  नाशिक रस्त्यावर अवसरी फाटा येथे पोलिस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे यांच्यासह पोलिस पथक कार्यरत होते. राजगुरुनगरकडे जाणारी वाहतूक अवसरी बुद्रुक, पाबळमार्गे शिक्रापूरकडे वळविण्यात आली होती. रस्त्यावरून पोलिसांची गस्त सुरू होती.

कामगार अडकले
चाकण औद्योगिक वसाहतीत विविध कंपन्यांमध्ये आंबेगाव व जुन्नर तालुक्‍यातील कामगारांची संख्या तीन हजारांच्या पुढे आहे. कामगारांची एकही बस चाकणला गेली नाही. तसेच, रविवारी (ता. २९) रात्री कामावर गेलेले कामगार परत आले नाहीत. कामगार कुटुंबीयांच्या संपर्कात असून, ‘काळजी करू नका,’ असा निरोप कामगारांकडून देण्यात आला आहे.

तरकारीची तोडणी थांबवली
चाकण येथील आंदोलनाची बातमी समजल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तरकारी मालाची तोडणी थांबविली. मंचर बाजार समितीत अडत्यांनी खरेदी केलेला माल आळेफाटा, माळशेज घाटातून कल्याण, मुंबईला नेण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे बाजार समितीवर फारसा परिणाम जाणवला नाही. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven hours Nashik road stop because of the agitation