#MarathaKrantiMorcha अघोषित बंदला शहरात हिंसक वळण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 July 2018

पिंपरी - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने चिंचवडगाव येथे फक्‍त श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. मात्र, सोशल मीडियावरून पिंपरी-चिंचवड बंद असल्याचे मेसेज फिरत होते. चिंचवडच्या वाल्हेकरवाडी भागात एका टोळक्‍याने दहा ते बारा दुकानांवर दगडफेक करीत दहशत निर्माण केली. तर, फुगेवाडी परिसरात बसवर दगडफेक करण्यात आली. यामुळे अघोषित बंदला हिंसक वळण लागल्याचे दिसून आले.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने चिंचवडगावात श्रद्धांजली आणि निषेध सभा सुरू होती. तर, वाल्हेकरवाडी आणि गुरुद्वारा परिसरात एका टोळक्‍याने दहशत निर्माण करण्यासाठी दहा ते बारा दुकानांवर दगडफेक केली. त्यात एचडीएफसी बॅंकेचे एटीएम आणि नेहा मोटर्स कंपनीच्या शोरूमचे नुकसान झाले. हेच टोळके चिंचवडच्या विविध भागांमध्ये फिरून बंदसाठी व्यापाऱ्यांना दमदाटी करीत होते. 

फुगेवाडी परिसरात २० ते २५ जणांच्या टोळक्‍याने पीएमपीच्या (एमएच-१२, एफसी-३३४३) या बसवर दगडफेक केली. मात्र, सुदैवाने यात कोणीही प्रवासी जखमी झाला नाही. त्यानंतर आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. घटनेनंतर परिसरात वाहतूक कोंडी झाली. भोसरी पोलिस आल्यानंतर आंदोलकांनी काढता पाय घेतला. काळेवाडी परिसरातही एक टोळके परिसरात फिरून बंदचे आवाहन करीत होते. येथे कोणतीही हिंसक घटना घडली नाही. मोशी परिसरातही दुचाकी फेरी काढली.

वाल्हेकरवाडी आणि गुरुद्वारा परिसरात दुचाकी फेरी काढून दुकानांवर दगडफेक केली. याची चित्रफीत पोलिसांच्या हाती लागली असून, संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. आम्ही लवकरच त्यांना अटक करू.
- सतीश पाटील, सहायक पोलिस आयुक्‍त, पिंपरी विभाग 

पोलिसांची पळापळ 
रविवार असल्याने अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी सुटीवर होते. हिंसक घटना घडू लागल्याने त्यांची पुन्हा ड्यूटीवर येण्यासाठी पळापळ झाली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Undeclared band in a violent turn