#NavDurga मनाला जागविणाऱ्या डॉक्टर

#NavDurga मनाला जागविणाऱ्या डॉक्टर

आपल्याकडे मानसशास्त्रीय उपचारांमध्ये रूढ झालेल्या पाश्‍चात्त्य पद्धतीला, भारतीय पारंपरिक गोष्टी सांगण्याच्या तंत्राची जोड देत डॉ. नीलम ओसवाल यांनी वैद्यकीय-सामाजिक प्रणालींचा महत्त्वाचा संगम साधला आहे. बौद्ध तत्त्वज्ञानातील  विपश्‍यना पद्धतीचा उपयोग करून  मनाची सजगता, सतर्कता वाढविण्यावर त्यांचा भर असतो.
 
मनोव्यथेने ग्रस्त झालेल्यांना एकंदरीतच मनाचे खेळ समजावून सांगत त्याकडे तटस्थतेनं पाहायला लावणं ही कामगिरी मोठ्या आव्हानाची असते. ती पेलत मानसशास्त्रज्ञ डॉ. नीलम ओसवाल उपचार करतात. 

त्या पुणे व फलटणमधील काही संस्थासोबत मानसोपचारतज्ज्ञ या नात्यानं महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात.  कामशेतजवळ ‘किशोर मित्र ट्रस्ट’द्वारा संचालित ‘पोटली’ या प्रकल्पांतर्गत, तीन वर्षांखालील बालकांच्या पालकांचं प्रबोधन करतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘पाली भाषा व बुद्ध तत्त्वज्ञान’ विभागात त्या मानद प्राध्यापक म्हणून शिकवायला जातात. 

मानसिक आजारांनी ग्रासलेल्या व्यक्तीवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी औषधोपचारांपेक्षाही जागृतीवर भर द्यावा, यासाठी नीलमताईंनी कार्यशाळा घेतल्या आहेत. कथाकथन तंत्राचा मानसोपचार पद्धतींमध्ये कसा उपयोग करता येईल, यावर त्यांनी मुंबई विद्यापीठातून डॉक्‍टरेट मिळवलेली आहे. पुस्तकं, शोधनिबंध, व्याख्यानं यांच्या माध्यमातून  त्या मनाच्या शुद्धीकरणासाठी खोलवर जाऊन प्रयत्न करण्याचं आवाहन करतात. समाजाच्या सर्वच थरांमध्ये, सर्व वयोगटांत आणि सर्व प्रकारच्या क्षेत्रांत मानसिक समस्या वाढत चाललेल्या दिसतात.  महानगरी, शहरी, निमशहरी, ग्रामीण, स्त्री, पुरुष, बालक, किशोर, तरुण, वयोवृद्ध, व्यावसायिक, नोकरदार, बेकार  अशा वर्गवारीनुसार या समस्यांमध्ये भेद असू शकतो. भीती, अतिचिंता, अध्ययनाच्या पातळीवरील समस्या आदींचं केवळ निराकरणच नव्हे तर मनाला सुदृढ करण्यासाठी सजगतेची शिकवण हा प्रभावी मानसोपचार, हे नीलमताईंचं आगळेवेगळेपण आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com