पुणे - ""औंधची यमाई आमचे कुलदैवत. नवरात्रात देवीचा जागर करतो. तांब्याच्या कलशावर घट बसवतो. पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची तर नऊ दिवस फुलांची माळ असते. कुलाचाराप्रमाणे यमाई, ईंजाबाई, पालीचा खंडोबा यांचे तीन टाक विड्याच्या पानावर बसविण्याची परंपरा आम्ही जपली आहे. उत्सवात सवाष्णींची ओटी भरून कुमारिका पूजनही करतो. तसेच, दररोज श्रीसूक्त पठण करतो,'' असे कात्रज येथील गृहिणी मनीषा पिंगळे सांगत होत्या.

शरद ऋतू आणि शारदीय नवरात्रोत्सवाला गुरुवारी सुरवात झाली. घरोघरची घटस्थापनेची परंपरा निरनिराळी. मनीषा उत्स्फूर्तपणे सांगत होत्या. साताऱ्याच्या पूर्वेकडे 40 किलोमीटर अंतरावर औंध हे गाव आहे. तेथील डोंगरावर यमाई देवीचे पुरातन मंदिर आहे. देवीच्या दर्शनाला मनीषा आवर्जून औंधला जातात.
त्या म्हणाल्या, ""अंबरीष ऋषींनी तपसाधना केलेल्या डोंगरावरच देवीची स्वयंभू साळुंका आहे. देवीची मूर्तीही आहे. आम्ही नवरात्रोत्सवात घट बसवितो. देवाला उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखविण्याची पद्धत आहे. कुटुंबातली मंडळी नऊ दिवस श्रीसूक्त म्हणतात. पुढच्या पिढीनेही धार्मिक व वैज्ञानिक भूमिका समजून घ्यावी आणि आनंदोत्सव साजरा करावा.''
दरम्यान, आश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर घरोघरी, देवीच्या मंदिरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमार्फत घटस्थापना करण्यात आली. ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी, भवानी माता, चतुःशृंगी देवस्थान, संतोषीमाता, तळजाई माता, महालक्ष्मी, काळी जोगेश्वरी, पिवळी जोगेश्वरी मंदिर यांसह शहर व उपनगरांतील विविध समाजाच्या देवीच्या मंदिरांतही नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरवात झाली. पहिल्या माळेपासूनच देवीची खणा-नारळाने ओटी भरण्यासाठी तसेच देवीला हिरवी साडी अर्पण करून दर्शन घेण्यासाठी मंदिरांमध्ये महिलांसह भाविकांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.
नवा विष्णू चौक मित्र मंडळाच्या वतीने महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते तांबडी जोगेश्वरी मंदिरात महिलांना खण, नारळ आणि साडी देऊन सन्मानित करण्यात आले. नगरसेवक हेमंत रासने, राजेश येनपुरे, नगरसेविका गायत्री खडके, मंडळाचे कार्याध्यक्ष कुमार रेणुसे, स्वप्नील शितोळे, नितीन पंडित, संतोष पोळ, रवी देशपांडे उपस्थित होते. सार्वजनिक मंडळांतर्फे बॅंडच्या सुरावटीत, ढोल-ताशांच्या गजरात देवीची मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करण्यात आली.