#saathchal आळंदी: पालखीचे पुण्यासाठी प्रस्थान; टाळमृदंगाचा निनाद

Alandi Palkhi departure towards pune
Alandi Palkhi departure towards pune

आळंदी :            'पंढरीच्या सुखा अंत पार नाही लेखा,
                        शेषा सहस्त्र मुखा न वर्ण वेची,
                        पंढरीच्या सुखा तोचि अधिकारी,
                        जन्मोजन्मी वारी घडली तया'

ही भावना मनी ठेवून कपाळी बुक्का आणि खांद्यावरील भगव्या पताका उंचावत अवघ्या महाराष्ट्रातून निघालेले लाखो वैष्णव गेली चार दिवसांपासूनच आळंदीत दाखल झाले. इंद्रायणीचा दोन्ही तीर आणि अवघी अलंकापुरी टाळमृदंगाचा गजर आणि माउली नामाच्या अखंड जयघोषाने आज दुमदुमुन गेली.

घराण्यात परंपरेने चालत आलेली आपली वारी विठूराया चरणी समर्पित करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांच्या मेळा आला. वारकऱ्यांच्या खांद्यावरील भगव्या पताकांनी आळंदीतील रस्ते फूलून गेले. ठायीठायी टाळमृदंगाचा निनाद अन् ज्ञानोबा माउली तुकारामाच्या अखंड जयघोष कानी पडत होता. 

माउलींच्या प्रस्थान सोहळ्यात हजेरी लावण्यासाठी राज्यभरातून अनेक छोट्यामोठ्या दिंड्या दाखल झाल्या. रथापुढे सत्ताविस दिंड्या, रथामागे दोनशे एक आणि तात्पुरते नंबर दिलेल्या सुमारे तीनशेहून अधिक
दिंड्या वारीत सहभागी होण्यासाठी आळंदीत गेली चार दिवसांपासून आल्या. आज होणाऱ्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी दोन लाख भाविक आळंदीत दाखल झाले. गेली दोन दिवस पाउस पडल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह होता. आज सकाळपासून वातावरण ढगाळ होते. मात्र दहानंतर पुन्हा उन सावल्यांचा खेळ सुरू झाला. पावसाने थोडीसी उघडीप दिल्याने वारकऱ्यांमधे उत्साह होता. शहरात ठिकठिकाणी राहू्ट्यां आणि धर्मशाळांमधून वारकऱ्यांच्या टाळमृदंगाचा जयघोष अन् हरिनामाचा गजर, ज्ञानेश्वरी पारायण सुरू होती.

आज पहाटे पासून दुथडी भरून वाहणाऱ्या इंद्रायणीत स्नानासाठी वारकऱ्यांनी गर्दी केली होती. पोलिसांकडून वारंवार इंद्रायणीचे पाणी जास्त असल्याने पाण्यात न उतरण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र तरिही एक वारकरी न जुमानता पाण्यात उतरला आणि वाहून गेला. सुमारे तीन ते साडे तीन तासांच्या अंतराने तो पुन्हा स्वतःहून बाहेर आला आणि सकाळी पोलिस चौकीत हजर झाला. यावेळी त्याने पोलिसांकडे कपडे आणि मोबाईलची मागणी केली. पोलिसांनी सदरच्या वारकऱ्यास त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. दरम्यान आवाहन करूनही अनेक वारकरी जीव धोक्यात घालून नदीपात्रात उतरत होते.

पोलिसांकडून वारंवार इंद्रायणीचे पाणी जास्त असल्याने पाण्यात न उतरण्याचे आवाहन करण्यात येत होते. मात्र वैष्णवांच्या या अलोट गर्दीने संपूर्ण इंद्रायणी परिसर गजबजला होता. इंद्रायणी तिरावर विविध दिंड्या भजन, भारूड अन माउलींचा जयघोष अखंड होता. डोक्यावर मोर पिसारा असलेली टोपी घातलेल्या वासुदेवांची हाळी सुरू होती. भक्ती रसात तल्लिन झालेल्या महिला पुरूष वारकरी आनंदाने हातात हात घेत फुगड्या खेळत होते. वारकऱ्यांचे खेळ मोबाईल, कॅमेऱ्यात टिपण्यासठी हौसी लोकांची गर्दी दिसून येत होती. अनेकजण वारकऱ्यांबरोबर सेल्फी काढून घेत होते. मंदिर परिसर आणि प्रदक्षिणा रस्त्यावर तसेच देहूफाटा येथे दुकानांची गर्दी होती. 

दरम्यान आज पहाटेपासून माउलींच्या मंदिरात समाधी दर्शनासाठी गर्दी होती. दर्शनासाठीची रांग नदीपलिकडे गेली होती. दुपारी बारानंतर मात्र वारकऱ्यांना वेध लागले ते मुख्य प्रस्थानच्या कार्यक्रमाचे. माउलीच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांनी बॅरिगेटिंग करून फक्त दिंड्यांनाच सोडण्याचे नियोजन केले होते. माउलींच्या मंदिराकडे जाणाऱ्यांना प्रस्थान काळात इतरांना प्रवेश बंदी होती. दुपारच्या प्रस्थान सोहळ्यास हजेरी लावण्यासाठी वारकऱ्यांची पावले मंदिराच्या दिशेने सरकत होती. दोनच्या सुमारास मानाच्या दिंड्यांना भराव रस्त्यावरून एकेक करून दिंड्या मंदिरात प्रवेश देण्यात आला. यावेळी प्रदक्षिणा रस्त्यावरही वारकऱ्यांची गर्दी होती. त्यानंतर प्रस्थानचा मुख्य कार्यक्रम सुरू झाला.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com