esakal | देहूत स्वच्छतेवर भर
sakal

बोलून बातमी शोधा

देहूत स्वच्छतेवर भर

देहूत स्वच्छतेवर भर

sakal_logo
By
मुकुंद परंडवाल

देहू - आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या १६ जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकरी, भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी देहू ग्रामपंचायतीने जय्यत तयारी केली आहे. निर्मल वारीसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे. पालखी मार्गावर आणि देहूतील विविध ठिकाणी ती ठेवले आहेत. दरम्यान, वारीच्या तयारीची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी देहूला भेट दिली.

पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधेसाठी देहू ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे ३०० आरोग्य किट्‌सचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी गणेश वालकोळी आणि सरपंच सुनीता टिळेकर यांनी दिली. गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत प्रशासनाने सूचना केलेल्या आहेत. तसेच सरकारकडे १० टॅंकरची मागणी केली आहे.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत देहूतील अंतर्गत रस्ते रुंदीकरण झालेले आहेत. या रस्त्यांच्या स्वच्छतेची कामे ग्रामपंचायतीने सुरू केलेली आहेत. तसेच रस्त्यांच्या कडेचा राडारोडा उचलला आहे. मुख्य देऊळवाडा ते बाजारपेठ या पालखी मार्गाचे नूतनीकरण केले आहे. या मार्गाच्या स्वच्छतेसाठी ४६ कर्मचारी तैनात आहेत.

ग्रामविकास अधिकारी गणेश वालकोळी म्हणाले, ‘‘ग्रामस्वच्छतेसाठी २५ कर्मचारी नियुक्त केले आहेत. सध्या इंद्रायणी नदी परिसर स्वच्छ करण्यात येत आहे. गावातील अंतर्गत रस्ते, गटारे यांची साफसफाई सुरू आहे. प्रस्थानाच्या दोन दिवसअगोदर दिंड्या व भाविक देहूत दाखल होतात. त्यांच्यासाठी स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या देहू शाखेला केली आहे. गावातील विहीर, हातपंपांची दुरुस्ती सुरू आहे. विंधन विहिरीतील पाणी शुद्धीकरणाचे काम सुरू आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यासाठी १५ कर्मचारी नियुक्त केले आहेत. यवत, लोणी काळभोर ग्रामपंचायत आणि पुणे महापालिकेने दहा युनिटचे १० फिरते शौचालये दिली आहेत. गावातील पथदिवे दुरुस्त केले जात आहेत. जिल्हा हिवताप केंद्राकडून सोहळ्याच्या दोन दिवसअगोदर कीटकनाशक फवारणी केली जाईल. त्यासाठी टीसीएल, बीएचसी पावडर उपलब्ध आहे. डास नियंत्रणासाठी धूरळणी केली जाणार आहे. त्यासाठी चार यंत्र खरेदी केले आहेत. माळवाडी, विठ्ठलवाडीतही स्वच्छतेची कामे सुरू आहेत. भाविकांना स्वच्छ पाणी देण्यासाठी प्रत्येक दिंडीला मेडिक्‍लोरच्या बाटल्यांचे वाटप केले जाणार आहे.’’

सरपंच सुनीता टिळेकर म्हणाल्या, ‘‘पालखी मार्गावरील राडारोडा उचलण्यात येत आहे. मार्गाची स्वच्छता करून कीटकनाशक फवारणी केली जाईल. त्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध आहे.’’