हडपसरमध्ये पालखी सोहळ्याचे स्वागत

palkhi hadpsar
palkhi hadpsar

मांजरी : शहरातील दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन व जयहरी विठ्ठल असा नामघोष आणि ज्ञानोबा माऊली-तुकाराम असा जयघोष करीत पंढरीची आस ठेऊन निघालेल्या आषाढी पालखी सोहळ्याचे भागवत भक्तांनी हडपसरमध्ये उत्साही वातावरणात स्वागत केले. पावसाच्या हलक्या सरी, ठिकठिकाणी रांगोळ्या काढून होणारे स्वागत आणि हरिनामाच्या गजराने अवघे वातावरण भक्तीमय झाले होते. 

ध्यास एक, आस एक, अट्टहास एक. मैलोन् मैल प्रवास करून पूर्णत्वाचे प्रतीक असणाऱ्या लाडक्या विठूरायाच्या चरणी लीन होण्याकरिता कपाळी केशरी गंध लावून, खांद्यावर भगव्या पताका घेऊन, डोईवर तुळशीवृंदावन घेत मुखाने अखंड ज्ञानोबा-माऊली तुकारामांचा गजर करत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत शिरोमणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज हडपसरमध्ये दाखल झाल्या. 

गेली काही दिवसांपासून दोन्ही पालख्यांच्या स्वागताची उत्साहात तयारी सुरू होती. पोलीस व पालिका प्रशासन, स्थानिक मंडळे, सामाजिक संस्था विविध राजकीय पक्ष व नागरिकांनी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले होते.  पालखी सोहळा हडपसर विसाव्यावर पोहोचण्याच्या आधीच वारकऱ्यांचे जथ्थे सकाळपासूनच हडपसरच्या दिशेने येत होते. भगव्या पताका, तुळशीच्या माळा आणि नामघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते. हडपसर, मांजरी, मुंढवा व आसपासच्या परिसरातून आलेले नागरिक मोठ्या भक्तिभावाने त्यांचे स्वागत करत होते. 

सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी गाडीतळ येथील विसाव्यावर दाखल झाली. सुमारे सव्वा तास विसाव्यावर माऊलींच्या पालखीचे दर्शन नागरिकांनी घेतले. त्यानंतर पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास सासवड मुक्कामी माऊलींच्या पालखीने प्रस्थान ठेवले. तर दुपारी बाराच्या सुमारास संत तुकाराम महाराज यांची पालखी गाडीतळ येथे विसाव्यावर दाखल झाली. पालखी विसाव्यावर दाखल होताच वरुणराजाने हजेरी लावत जलाभिषेक घातला. जय जय रामकृष्णहरीचा निरंतर नामजप, जोडीला टाळमृदंग, त्याच्या तालावर डोलणारी पावले हे दृश्य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्यने गर्दी केली होती. संत तुकारामांचा चांदीचा रथ लक्ष वेधून घेत होता. मन प्रसन्न करणारी फुलांची आकर्षक सजावट, त्यावर केलेली फुग्याची आरास, हे सारे आपला कँमेरा व मोबाईलमध्ये टिपण्यासाठी गर्दी दाटली होती. 

विठूनामाचा गजर हरीनामाचा झेंडा रोविला या उक्तीप्रमाणे त्यांची पावले भर पावसातही झपाझप आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पडत होती. दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने लोणी काळभोर मुक्कामी प्रस्थान केले. वारीत लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण आनंदाने सहभागी झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भक्तांची संख्या मोठी असल्याचे पाहावयास मिळाले. वारकरी बांधवांनी दाटलेला गाडीतळ परिसर याची प्रचिती देत होता.

जगद्गुरू संत तुकाराममहाराज यांचा पालखीसोहळा  आल्यानंतर पावसाने भाविकांना आपल्या सरींनी चिंब केले; मात्र यामुळे त्यांच्या उत्साहात कुठेही कमतरता नव्हती. याउलट पावसाच्या सरी अंगावर घेत मोठ्या आनंदाने ज्ञानोबा तुकाराम, जय जय रामकृष्णहरी, बोला पुंडलिक हरी विठ्ठल श्रीनामदेव तुकारामांचा गजर सुरूच होता. लहान मुले, महिला, ज्येष्ठ वारकरी यांचा सहभाग लक्षणीय होता. 

वारकरी बांधवांचा पाहुणचार करण्यात वानवडी, हडपसर, मांजरी, शेवाळेवाडी परिसरातील नागरिकांची अगत्यशीलता जागोजागी पाहावयास मिळत होती. पंढरीकडे प्रयाण करणाऱ्या वारकरी बांधवांना सामाजिक, पर्यावरणपूरक, आरोग्यविषयक संदेश देण्याकरिता सामाजिक सेवांनी पुढाकार घेतला होता. पोस्टर, पत्रके, निरनिराळी वेशभूषा यांच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती करत प्रबोधनाचे काम केले. यात तरुणाईचा सहभाग उत्स्फूर्त होता.  

स्वागत आणि फराळाचे वाटप 

भैरोबानाला येथे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी महापौर प्रशांत जगताप, रत्नप्रभा जगताप, कालिंदा पुंडे, धनराज घोगरे, शिवाजीराव केदारी, साहिल केदारी, अभिजीत शिवरकर, कविता शिवरकर, रामटेकडी येथे नगरसेवक आनंद आलकुंटे, विलास आलकुंटे, मगरपट्टा चौक येथे माजी उपमहापौर निलेश मगर, प्रशांत तुपे तसेच गाडीतळ येथे विजया कापरे, आबा कापरे, फारूक इनामदार, सुफीयान इनामदार, संजय घुले, विजया वाडकर, पोपटराव वाडकर, तालुका तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष विकास गायकवाड यांनी पालखीचे स्वागत करून भाविकांना फराळाचे वाटप केले. तर गाडीतळ पालखी विसाव्यावर महापौर मुक्ता टिळक,विरोधी पक्षनेते चेतन तुपे, नगरसेविका उज्वला जंगले, हेमलता मगर, मारुती तुपे, योगेश ससाणे, वैशाली बनकर, सुनील बनकर, नाना भानगिरे, विजय देशमुख ,सुभाष जंगले, प्रवीण तुपे आदिंनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.

अरूणदादा बेल्हेकर युवा राष्ट्र निर्माण संस्थेच्या वतीने व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात आली. हडपसर मेडिकल असोसिएशनच्या वतीने  अवयवदान  जनजागृती व मुलगी वाचवा अभियान रॅलीचे आयोजन केले होते .संत सोपानकाका सहकारी बँक, सन्मित्र सहकारी बँक, साधना सहकारी बँक, कल्याण जनता, तसेच परिसरातील विविध संघटनांनी फराळाचे व पाण्याचे वाटप केले.

मांजरी फार्म येथे  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस तसेच  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल, तसेच शेवाळेवाडी येथील शंभुराजे प्रतिष्ठान च्या वतीने वारकऱ्यांना मोफत आरोग्य तपासणी शिबीर तसेच फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी सुरेश घुले, राहुल शेवाळे अजिंक्य घुले, शिवाजी खलसे, डॉ. लाला गायकवाड, डॉ.शिवदीप उंदरे, अशोक मोरे, प्रतिमा शेवाळे, चंद्रकांत शेवाळे, विलास शेवाळे, राजेंद्र घुले, पंढरीनाथ शेवाळे, सुनील शेवाळे, संभाजी हाक्के आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भेकराईनगर येथे हरपळे हॉस्पिटलच्यावतीने वारकरी भाविकांसाठी मोफत औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच वारकऱ्यांना फराळ व चहापान देण्यात आले. हरपळे हॉस्पिटलच्या वतीने प्रत्येक दिंडीप्रमुखास श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले व मोफत पुस्तकाचे वाटप करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ.बाळासाहेब हरपळे यांनी  पालखीचे स्वागत करून माऊलींच्या रथाचे स्वारथ्य केले. डॉ. उज्वला हरपळे ,डॉ. नेहा शेवाळे, डॉ. हर्षदा यादव, डॉ. कोमल कोळेकर यांनी रुग्णाची तपासणी केली.  प्रणवराजे हरपळे, प्रतीक कवठेकर ,सनी शेवाळे ,प्रणय देवकर यांनी शिबीराचे संयोजन केले .
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com