सोशल मीडियाही माउलीमय 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 June 2017

पुणे - रंग वारीचे... रंग वैष्णवांचे...असीम भक्तीचे...एक हृद्य सोहळ्याचे, असे भक्तिरंग सोमवारी सोशल नेटवर्किंग साइट्‌सवर पाहायला मिळाले. संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे रविवारी पुण्यात आगमन झाले अन्‌ सोशल मीडियाही या भक्तिरंगात रंगून गेला. विसाव्यासाठी थांबलेल्या पालखीच्या प्रत्येक क्षणांनी फेसबुक अन्‌ इन्स्टाग्रामचे वॉल भरले होते. 

पुणे - रंग वारीचे... रंग वैष्णवांचे...असीम भक्तीचे...एक हृद्य सोहळ्याचे, असे भक्तिरंग सोमवारी सोशल नेटवर्किंग साइट्‌सवर पाहायला मिळाले. संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे रविवारी पुण्यात आगमन झाले अन्‌ सोशल मीडियाही या भक्तिरंगात रंगून गेला. विसाव्यासाठी थांबलेल्या पालखीच्या प्रत्येक क्षणांनी फेसबुक अन्‌ इन्स्टाग्रामचे वॉल भरले होते. 

व्हॉट्‌सऍप असो वा ट्विटर पालखीच्या छायाचित्रांनी अन्‌ व्हिडिओमधून या भक्ती सोहळ्याचा प्रत्येक रंग अन्‌ प्रत्येक क्षण नेटिझन्सपर्यंत पोचत होता. मुक्कामासाठी असलेल्या दिंडीतील प्रत्येक क्षणही फेसबुक लाइव्हद्वारे नेटिझन्सना पाहता आला. पण, दोन्ही पालखीच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा भावरंगही त्यांना अनुभवता आला. 

मुक्कामाच्या दरम्यानचे दिंडीतील अन्‌ पालखी विसाव्याच्या ठिकाणचे क्षणचित्रे फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपवर पाहायला मिळाले. दिंडीतील वैविध्य अन्‌ वारकऱ्यांसोबतचा प्रत्येक क्षण, त्यांच्यातील वेगळेपण आणि टाळमृदंगाच्या जयघोषात भजनात रमलेल्या वारकऱ्यांच्या टिपलेल्या भावमुद्रा फेसबुकवर शेअर झाल्या, तर काहींनी दिंडीतील प्रत्येक क्षण व्हिडिओमध्ये कैद करून तो फेसबुक, व्हॉट्‌सऍप आणि ट्विटरवर पोस्ट केला. काही जणांनी वारकऱ्यांबरोबरचा खास सेल्फीही फेसबुकवर कव्हर फोटोमधून शेअर केला, तर पालखीचे दर्शन घेतानाचे छायाचित्र प्रोफाइल पिक्‍चर म्हणून अपलोड केले. 

पालखी सोहळ्यातील आठवणींना उजाळा देत काहींनी फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपवर खास संदेशही पोस्ट केले. स्वतःच्या नजरेतून पालखी अशा आशयाखालील संदेश प्रत्येकाने शेअर करत वारीविषयी असलेल्या आठवणींना उजाळा दिला. वारकऱ्यांसोबतच्या गप्पा आणि त्यांच्यासोबतचे प्रत्येक क्षण सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. कपाळावर टिळा लावलेला, डोक्‍यावर तुळशी वृंदावन घेतलेला, हाती भगव्या रंगाचा झेंडा घेताना आणि वारकऱ्यांसोबत टाळमृदंगाच्या गजर करतानाचे छायाचित्र फेसबुक, व्हॉट्‌सऍप, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर प्रोफाइल पिक्‍चर म्हणून अपलोड करण्यात आले. 

अमित कोदेरे यानेही पालखी सोहळ्यात टिपलेले काही छायाचित्र फेसबुकवर अपलोड केले आणि त्यावर लाईक्‍सचा पाऊस पडला. हौशी छायाचित्रकारांनी टिपलेली पालखीतील छायाचित्रांना नेटिझन्संची पसंतीही मिळाली. यावर्षी पालखीत सेल्फी स्टीक घेऊन सेल्फी टिपणाऱ्या तरुण-तरुणींची कमतरता नव्हती. एकूणच दोन्ही पालखीच्या विसाव्यातील आणि दिंडीतील प्रत्येक क्षण सोशल नेटवर्किंग साइट्‌सद्वारे लोकांपर्यंत पोचला. 

फेसबुक लाइव्हद्वारे माऊलीचे दर्शन 
विसाव्यासाठी थांबलेल्या दिंडीतील वारकऱ्यांसोबत प्रत्येक क्षण फेसबुक व इंस्टाग्राम लाइव्हद्वारे नेटिझन्संना पाहायला मिळाला. तर तरुणाईने फेसबुक लाइव्हद्वारे दोन्ही पालख्यांचे दर्शन घडवले. पालखी सोहळ्याचे ज्यांना दर्शन घेणे शक्‍य नव्हते त्यांना फेसबुक लाइव्हद्वारे घरबसल्या सोहळ्याचे दर्शन घेता आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpur Wari 2017