विठ्ठलनामाने दुमदुमली पुण्यनगरी 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 June 2017

वारीला निघालेल्या वारकऱ्यांना म्हणे वयाचं, अंतराचं, दिवसदिवस पायी फिरून येणाऱ्या थकव्याचं असं काही भान नसतंच. मनात माउलींचं नाव घेतलं की तोच या सगळ्या गोष्टींना सहन करण्याचं बळ अंगी फुंकत असतो त्यांच्या... ज्याने कुणी हे म्हणून ठेवलंय ते अगदी खरंच आहे. नाहीतर, देहू- आळंदीहून पायी चालत पुण्यात रात्री साडेदहा- अकराच्या सुमारास मुक्कामी पोचलेल्या या सगळ्यांच्या अंगात दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे चारच्या ठोक्‍याला माउलींच्या दर्शनासाठी हजर राहण्याचं बळ आलं असतं तरी कुठून?... 

पुणे - सोमवारी पहाटे भवानी पेठेत असलेल्या ज्ञानोबा आणि नाना पेठेतील तुकोबांच्या पालख्यांच्या मुक्कामी असलेल्या या उत्साही भाविकांना पाहून "माउली'नामातली आंतरिक शक्ती शब्दशः जाणवून आली. "भेटी लागे जीवा, लागलेली तुझीच आस' हीच भावना आज सर्वत्र दिसत होती. 

रविवारच्या दिवशी ज्ञानेश्वर माउली आणि संत तुकोबांच्या पालख्यांचं आळंदी अन्‌ देहूहून पुण्यात मोठ्या थाटात आगमन झालं. यंदा पाऊसही वेळेवर बरसल्यामुळे अंगी अधिकचा उत्साह आणि चेहऱ्यांवर आनंद घेऊनच वारकरी बांधव पुण्यनगरीत येते झाले. याच पार्श्वभूमीवर यंदा मुक्कामाच्या दिवशीचं खास पहाटेचं वातावरण टिपावं आणि ते आपल्या वाचक- प्रेक्षकांनाही अनुभवायला द्यावं, म्हणून "सकाळ'ने ज्ञानोबा- तुकोबांच्या पालखी मुक्कामाच्या ठिकाणी "फेसबुक लाइव्ह' देखील केलं. 

खरं सांगायचं तर भक्ती, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, शिस्त, सहकार्य, संघभावना, विनय, समर्पण अशा अनेक गुणांचं वारकऱ्यांच्या रूपातलं प्रत्यक्ष दर्शनच यानिमित्ताने इथे घडू शकलं. 

डोळ्यांच्या कवेत सामावणार नाही अशी अलोट गर्दी आणि भाविकांच्या रांगा ज्ञानोबा- तुकोबांच्या पादुकांच्या दर्शनासाठी अनुक्रमे भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिर आणि श्री निवडुंगा विठोबा देवस्थान संस्थान या दोन्ही मंदिरांपाशी कधीच जाऊन पोचल्या होत्या. महिला आणि पुरुषांच्या स्वतंत्र रांगा, त्यात कुणीही न सांगता स्वतःहून राखली गेलेली शिस्तबद्ध रचना, भाविकांच्या सुविधेसाठी असणारे कर्मचारी आणि सुरक्षेसाठी असणारा चोख पोलिस बंदोबस्त, असं दृश्‍य दोन्ही ठिकाणी दिसत होतं. 

एकीकडे दर्शन घेणारे भावोत्कटतेने पादुकांचं अन्‌ विठुमाउलींचं दर्शन घेऊन बाहेर पडत होते, तर दुसरीकडे त्याच्या दुप्पट वेगाने दर्शनाची आस घेऊन आलेले भाविक रांगेत लागत होते. यानिमित्ताने भवानी पेठेला भल्या पहाटे आलेली उत्साही झळाळी देखील पावलोपावली जाणवून येत होती ! 

अर्थात, उत्साहाचं हे वातावरण आणि ही लगबग केवळ शहराच्या मध्यवर्ती भागातच होती, असं नाही. शहरात इतरत्र/ काही उपनगरांत विसाव्यास थांबलेले वारकरी आणि अनेक पुणेकर देखील पालखी सोहळ्याचं आणि पादुकांचं दर्शन घेण्यासाठी आवर्जून पालखी मुक्कामी पोचत होते. पालख्यांच्या निमित्ताने शहरच जणू आज ठरवून लवकर उठलं होतं. 

विविध रस्त्यांवरून पालख्यांपर्यंत येताना "ज्ञानोबा- तुकोबा', "माउली माउली', "जय जय राम-कृष्ण-हरी', "पुंडलिक वरदे'... असे अनेक जयघोष कान तृप्त करत होते. ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदिरांत तर श्रवणीय कीर्तनांचं पीकच फुललं होतं. गाणारा एक आणि त्यास साथ देणारे अनेक, असं इथलं दृश्‍य एक विलक्षण उत्साह अंगी जागवत होतं. विशेष म्हणजे, हे सारे जयघोषच अनेकांना "जागते व्हा' म्हणत झोपेतून अलगद उठवतही होते... 

एकीकडे आन्हिकं आटोपून भक्तिभावाने दर्शनासाठी जाणारे भाविक जसे दिसत होते, तसंच दुसरीकडे दर्शन घेऊन परतणाऱ्यांसाठी, वारकऱ्यांसाठी अनेक समाजसेवी बांधव आणि संस्थांतर्फे न्याहारीची सोयही केली जात असल्याचं दिसून आलं. एकूणच एखाद्या आनंदयात्रेचं स्वरूप आज शहराला आल्याचं दिसून आलं. 

सहा हजार भाविकांनी अनुभवला  पालखी मुक्काम "ऑनलाइन' ! 
"सकाळ'च्या फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून ज्ञानोबा- तुकोबांच्या पादुकांचं ऑनलाइन दर्शन सुमारे सहा हजार भाविकांनी पहाटे साडेपाच ते साडेसहा या वेळेत घेतलं. विशेष म्हणजे, ज्ञानोबा माउलींच्या पादुकांना केलेला अभिषेक आणि आरतीचा अनुभवही भाविकांना या वेळी "लाइव्ह' घेता आला. पहाटे काकड आरती झाल्यावर माउली आणि तुकोबारायांच्या चांदीच्या पादुकांवर दुधाची धार धरली होती, तेव्हा ब्रह्मवृंद मंत्रोच्चारात, तर वारकरी हरिपाठाचे स्वर आळवत होते. थेट प्रक्षेपण होत असताना प्रेक्षकांकडून माउली आणि तुकोबांच्या जयजयकाराच्या "कमेंट्‌स' येत होत्या. माउलींची साग्रसंगीत आरती सुरू असताना मंदिरातील वातावरण भक्तिभावाने भरून पावलं होतं. जयघोषाच्या सोबतीला असणारी टाळांच्या तालाची साथ भाविकांना अधिकच तल्लीन करत होती. 

हाती सेल्फी स्टिक अन्‌  मनी आस डोकं टेकवण्याची... 
ज्ञानोबा- तुकोबांच्या पादुकांवर क्षणभर डोकं टेकायला मिळावं, त्यांना तेवढ्याच वेळेत डोळे भरून पाहता यावं, हात लावून नमस्कार करता यावा, यासाठी डोळेभरली आस घेऊन आलेले भाविक भल्या पहाटे पाहायला मिळत होते. अनेकजण आपल्या चिमुकल्यांसह आले होते. भक्तिरसात चिंब झालेल्या या वातावरणात सारे सारे जणू माउलीमय झाले होते. हाती टाळ घेतलेले वृद्ध वारकरी आणि त्याचवेळी हाती सेल्फी स्टिक आणि कॅमेरा घेतलेले तरुण अशा दोन्ही पिढ्यांचा अभिनव असा पारंपरिक- आधुनिक मिलाफही या वेळी दिसून आला. 

मुक्काम तीच पंढरी ! 
शहराच्या उपनगरीय भागांत अनेक ठिकाणी वारकऱ्यांनी आपापली विसाव्याची ठिकाणं निवडून तिथे मुक्काम केला होता. या ठिकाणाहून प्रत्येकालाच भवानी पेठेपर्यंत येणं शक्‍य नव्हतं. अर्थात, त्यामुळे त्यांच्या भक्तिसाधनेत कसलाही फरक पडल्याचं दिसलं नाही. "जिथे मुक्काम तीच आमची पंढरी' म्हणत अनेक जणांनी आहे तिथेच हरिपाठ वाचन आणि ज्ञानोबा- तुकोबा- माउलीनामाचा गजर सुरू केल्याचं दिसून आलं. वारीने अवघी पुण्यनगरी अशी व्यापून राहिली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpur Wari 2017