esakal | पुण्यनगरीत विसावल्या ज्ञानोबा, तुकोबांच्या पालख्या 
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यनगरीत विसावल्या ज्ञानोबा, तुकोबांच्या पालख्या 

पुण्यनगरीत विसावल्या ज्ञानोबा, तुकोबांच्या पालख्या 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - मुखी हरीचे नाम, डोईवर तुळशी वृंदावन, हाती टाळ, मृदंगाचा गजर, ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात खांद्यावर भागवत धर्माची पताका घेऊन पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीला निघालेल्या संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पुण्यनगरीत रविवारी (ता. 18) आगमन झाले; परंतु श्री शिवप्रतिष्ठान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पालखी मार्गावर अडथळा आणल्याचा आक्षेप घेत आळंदी देवस्थानच्या विश्‍वस्तांनी पोलिसांकडे तक्रार करून गोपाळकृष्ण गोखले चौकात चाळीस मिनिटे पालखी थांबविली. या घटनेमुळे सोहळ्याला वादाचे गालबोट लागले. 

संत तुकाराम महाराजांची पालखी निवडुंगा विठोबा देवस्थान (नाना पेठ) येथे रात्री सव्वानऊ वाजता; तर संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी साडेदहा वाजता पालखी विठ्ठल मंदिर (भवानी पेठ) येथे मुक्कामी पोचली. उद्या (ता. 19) या दोन्ही पालख्यांचा मुक्काम आहे. मंगळवारी (ता. 20) पहाटे दोन्ही मंदिरांतील विठ्ठल-रुक्‍मिणीच्या मूर्तींची विधिवत पूजा झाल्यावर दोन्ही संतांच्या चांदीच्या पादुकांवर अभिषेक होईल. काकडआरती झाल्यावर पालख्या मार्गस्थ होतील. 

पालखीमार्गांवर भक्तिगीतांच्या सीडी लावून वारकऱ्यांचे स्वागत होत होते. भाविकांतर्फे वारकऱ्यांना मिष्टान्न भोजनाची व्यवस्था केल्याचे दृश्‍य पाहायला मिळाले. वरुणराजाने विश्रांती घेतल्याने तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी राजकीय नेते, सामाजिक संस्थांची फ्लेक्‍सबाजी चौकाचौकांत दिसत होती. वाकडेवाडी येथे दोन्ही पालख्यांचे स्वागत महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, आयुक्त कुणाल कुमार यांनी केले. 

संत तुकाराम महाराजांच्या पालखीनंतर गवरशेठ वाणी व संताजी जगनाडे महाराज यांच्या पालख्या मार्गस्थ होतात. त्यानंतर माउलींची पालखी येते. फर्ग्युसन रस्त्यावर माउलींचा पालखी सोहळा आला. त्याचवेळेस माउलींचा नगारखाना आणि श्री शिवप्रतिष्ठानचे बहुसंख्य कार्यकर्ते समांतर चालू लागले. त्या वेळी पोलिसांनी नगारखाना थांबवला. त्यावर संतप्त झालेल्या आळंदी देवस्थानचे विश्‍वस्त व सोहळ्याचे चोपदार यांनी आहे त्याच ठिकाणी पालखी सोहळा थांबविला. सुमारे चाळीस मिनिटांनतर पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर पालखी मार्गस्थ झाली. यापुढे असा प्रकार होऊ न देण्याचे लेखी आश्‍वासन पोलिसांना द्यावे लागले. 

...अन्यथा पालखीचा मार्गही बदलू 
""संत तुकोबांच्या पालखीनंतर गवरशेठ वाणी व संताजी जगनाडे महाराज यांच्या पालख्या मार्गस्थ होतात. त्यानंतर माउलींची पालखी येते; मात्र अलीकडच्या काही वर्षांत हा पारंपरिक क्रम मोडत काही हिंदुत्ववादी विचारांच्या संघटना पालखी मार्गात घुसतात. त्यामुळे मार्गात अडथळा येतो. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त अशा विविध पातळींवर हा विषय गेली चार वर्षे लेखी स्वरूपात मांडूनही त्यावर प्रशासनाकडून उपाययोजना झालेल्या नाहीत. आजही पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांना पूर्वकल्पना देऊनही हा प्रकार पुन्हा घडला. याविषयी तातडीने लक्ष घालून मार्ग काढावा; अन्यथा आम्ही माउलींच्या पालखीचा मार्गही बदलू,'' असे आळंदी देवस्थानचे राजाभाऊ चोपदार यांनी सांगितले.