esakal | वैष्णवांचा मेळा पुण्यनगरीत
sakal

बोलून बातमी शोधा

वैष्णवांचा मेळा पुण्यनगरीत

विविध ठिकाणी वारकऱ्यांसाठी व्यवस्था
रांगोळ्यांच्या पायघड्याने स्वागत
 ‘आयटी’तील तरुणाईकडून भगवे फेटे परिधान करून पालख्यांना मानवंदना
 चहा, कॉफीसह उपवासाच्या पदार्थांचे वाटप 
वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी धर्मशाळा, महापालिकेच्या शाळा आणि खासगी कार्यालये सज्ज
शहर परिसरात ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी राहुट्या टाकल्या गेल्या होत्या

वैष्णवांचा मेळा पुण्यनगरीत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - 
गोड तुझे रूप गोड तुझे नाम ।
देई मज प्रेम सर्वकाळ।।

असे अभंग म्हणत आणि टाळ, मृदंगाचा गजर करीत भक्तिरसात तल्लीन झालेला वैष्णवजन रविवारी पुण्यनगरीत दाखल झाले.आयटीतील तरुणाई उत्साहात कपाळावर नाम काढून वारकऱ्यांसमवेत सेल्फी काढत होती. अभंगही गात होती. भगवे फेटे परिधान करून ही तरुणाई छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष करीत पालख्यांना मानवंदना देत होती.

सावळ्या विठ्ठलाच्या ओढीने पंढरीला निघालेला हा वैष्णवजनांचा मेळा ऊन, वारा आणि पावसाचीही तमा न बाळगता चालत होता. संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील वैष्णवजनांचे विविध सामाजिक, स्वयंसेवी संस्था, हौशी समूहातर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले. श्री क्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि श्री क्षेत्र देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. या सोहळ्यात लाखो वैष्णव सहभागी झाले होते. ज्येष्ठ वद्य नवमीच्या मुहूर्तावर पुण्यनगरीत वैष्णवांनी प्रवेश केला. त्या वेळी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून भाविकांनी त्यांचे स्वागत केले. 

टाळ-मृदंगाच्या गजरात हरीचा जयघोष करण्यात वारकरी तल्लीन झाले होते. पालखी मार्गाच्या दुतर्फा भाविकांतर्फे वारकऱ्यांना चहा, कॉफीसह उपवासाच्या पदार्थांचे वाटप करण्यात येत होते.

श्रीशिवप्रतिष्ठानतर्फे पालख्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. स्वागताकरिता वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आलेल्या तरुण- तरुणींनी भगवे फेटे परिधान करून पालख्यांना मानवंदना दिली. दरवर्षीप्रमाणे आळंदी ते पुणे प्रवास करणाऱ्या आयटीतील दिंडीमध्ये महिलांचा सहभाग वाखाणण्यासारखा होता.