#SaathChal आई-वडिलांच्या स्वास्थ्यासाठी ‘माउलीं’ची साथ

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 June 2019

‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या सेवेची’ ही संकल्पना घेऊन ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आषाढी वारीनिमित्त ‘साथ चल’ उपक्रम राबविण्यात येत आहे. यात सहभागी होऊन भाविकांनी आई-वडिलांच्या स्वास्थ्यासाठी वारीत दोन पावले चालावीत, त्यांच्या निरोगी आयुष्याकडे लक्ष द्यावे, असा संदेश दिला जाणार आहे. या उपक्रमात आळंदीतील संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटी आणि आळंदी देवस्थानचे मानकरी सहभागी होणार आहेत.

आळंदी - ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या सेवेची’ ही संकल्पना घेऊन ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आषाढी वारीनिमित्त ‘साथ चल’ उपक्रम राबविण्यात येत आहे. यात सहभागी होऊन भाविकांनी आई-वडिलांच्या स्वास्थ्यासाठी वारीत दोन पावले चालावीत, त्यांच्या निरोगी आयुष्याकडे लक्ष द्यावे, असा संदेश दिला जाणार आहे. या उपक्रमात आळंदीतील संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटी आणि आळंदी देवस्थानचे मानकरी सहभागी होणार आहेत.

हिंदू संस्कृती आणि वारकरी संप्रदायाचा पाया आई-वडील आहेत. त्यांची सेवा म्हणजे ईश्‍वर सेवा. सध्या विभक्त कुटुंबांचे प्रमाण वाढले आहे. आई-वडिलांप्रति निष्ठा आणि सेवेपासून तरुणपिढी दुरावत आहे. ‘साथ चल’ उपक्रम राबविल्याबद्दल ‘सकाळ’चे अभिनंदन. सर्वांसाठी प्रेरणादायी उपक्रम आहे. प्रेम आणि कर्तव्याची भावना ठेवून आई-वडिलांची सेवा अपेक्षित आहे. लोकचळवळ होणे गरजेचे आहे. 
- ॲड. विकास ढगे पाटील, प्रमुख विश्‍वस्त, आळंदी देवस्थान

‘सकाळ’ने सुरू केलेला उपक्रम उत्तम व स्तुत्य आहे. आई-वडिलांविषयी आदरभाव, सेवाभाव रुजावा आणि तरुणांमध्ये जागृती व्हावी यासाठी वारीच्या माध्यमातून ‘सकाळ’ने ‘साथ चल’ उपक्रम राबवून योग्य रीतीने विषय हाताळला आहे. या निमित्ताने तरुणाईत आई-वडिलांच्या स्वास्थ्य आणि जबाबदारी याबाबत जागृती होईल.
- रामभाऊ चोपदार, मानकरी, आळंदी देवस्थान

‘साथ चल’ उपक्रमाला प्रथम शुभेच्छा. आई-वडिलांप्रति आदराची आणि सेवेची भावना रुजविण्याच्या दृष्टीने योग्य आणि सकारात्मक उचललेले ‘सकाळ’चे पाऊल असून तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने सामील होणे आवश्‍यक आहे. तरुण पिढीने महाविद्यालयीन स्तरावर या उपक्रमाबाबत वृद्धाश्रम, निराधार केंद्र या ठिकाणी वंचितांना आधार देत वर्षभर जनजागृती केली पाहिजे.
- राजाभाऊ आरफळकर, पालखी सोहळा मालक 

‘साथ चल’ उपक्रमामुळे आई-वडिलांच्या सेवेसाठीची जाणीव या उपक्रमातून प्रत्येक मुलांमध्ये तयार होईल. आई-वडील हेच खरे दैवत असून, उपक्रमाच्या माध्यमातून सहभागी युवक आई-वडिलांशी समरस राहतील. कुटुंबातील नात्यांचा दुरावा नष्ट होण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्‍यकता आहे. वारकरी संप्रदाय, कीर्तनकार, प्रवचनकार यांचा उपक्रमाला पाठिंबा आहे. यात केवळ सहभागी न होता जनजागृतीसाठी वर्षभर पुढाकार राहील. 
- बाळासाहेब आरफळकर, पालखी सोहळा मालक

आई-वडिलांच्या सेवेची शिकवण संतांनी दिली आहे. या मार्गावरून चालताना आई-वडील हेच दैवत आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि ईश्‍वरापर्यंत जाण्याचे माध्यम आई-वडील आहेत. त्यांच्या सेवेतच खरे आत्मसुख आहे. मुलांचे सर्व गुन्हे माफ करून जीवनात नव्या उमेदीने चालण्याची प्रेरणा तेच देतात. त्यांना दूर लोटून कसे चालेल. त्यांच्या सेवेची प्रवृत्ती तरुणाईत निर्माण होण्यासाठीची ‘साथ चल’ उपक्रम स्तुत्य आहे.
- बाळासाहेब चोपदार, मानकरी, आळंदी देवस्थान

हल्ली आई-वडिलांपासून लांब राहण्याचा ट्रेंड सुरू झालाय. मात्र त्यांचा आदर ठेवून सेवा, शुश्रूषा करणे आवश्‍यक आहे. त्यांची सेवा ही एक लोकसेवाच असते. त्यांचा सहवास, संभाषण आणि मार्गदर्शन युवकांना गरजेचे आहे. आई-वडील सर्वस्व मानून युवकांनी त्यांची सेवा करणे गरजेचे आहे. तसा संदेश जोपासला पाहिजे. ‘साथ चल’च्या माध्यमातून युवकांना नक्कीच सकारात्मक संदेश पोचेल.
- योगेश देसाई, पालखी सोहळा प्रमुख व विश्‍वस्त

आई-वडील हे विठ्ठलाचा गाभा आहे. त्याच्याशी सुसंवादी असणे आवश्‍यक आहे. भक्त पुंडलिकाला विठ्ठलाने घरी जाऊन दर्शन दिले. त्यांचा आदर्श तरुणाईने ठेवावा. कारण आई-वडिलांनी अनेक तडजोडी करून मुलांना वाढविलेले असते. मात्र त्यांना उतारवयात वृद्धाश्रमात पाठविले जाते. हे चुकीचे आहे. आई-वडील केंद्रस्थानी ठेवून ‘सकाळ’ने राबविलेला उपक्रम वारकरी संप्रदायाच्या विचारसरणीच्या गाभ्याशी जात असून कौतुकास्पद आहे.
- डॉ. अभय टिळक, प्रमुख विश्‍वस्त, आळंदी देवस्थान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saath Chal for Mother and Father Aashadhi Wari Palkhi Sohala