#SaathChal ‘साथ चल’ उपक्रमामुळे नवी परंपरा!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 June 2019

दर्शनासाठी भाविकांची गर्दी
तुकाराम महाराजांच्या पालखीने गाडीतळ येथे विसावा घेतला. महापौर मुक्ता टिळक यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. या वेळी शहराच्या विविध भागांतील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता.

पुणे/ हडपसर - संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत ‘साथ चल’ करीत नागरिक व विद्यार्थ्यांनी आई-वडिलांची अखंड सेवा करण्याची शपथ घेतली. निमित्त होते ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या ‘साथ चल’ उपक्रमाचे! या माध्यमातून एक समाजभिमुख परंपरा निर्माण होईल, असा विश्‍वास या वेळी भाविकांनी व्यक्त केला.

हडपसर येथील डॉ. राम मनोहर लोहिया उद्यानात ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘साथ चल’ उपक्रमांतर्गत विद्यार्थी व नागरिकांना आई-वडिलांची सेवा  करण्याची शपथ देण्यात आली. ज्ञानप्रबोधिनी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय आणि एस. एम. जोशी कॉलेजमधील विद्यार्थी आणि हडपसर कला मंचचे कलाकार या वेळी उपस्थित होते. स्थानिक आजी, माजी लोकप्रतिनिधीही या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते. विद्यार्थी, कलाकार आणि स्थानिक नागरिकांनी आई-वडिलांच्या संगोपनाची शपथ घेत ‘साथ चल’ उपक्रमात सहभाग नोंदवला.

आमदार योगेश टिळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, माजी महापौर वैशाली बनकर, नगरसेविका उज्ज्वला जंगले, पूजा कोद्रे, नगरसेवक नाना भानगिरे, योगेश ससाणे, मारुती तुपे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, नीलेश मगर, कलाकार मंचाचे प्रशांत बोगम आणि विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी या उपकक्रमात सहभागी झाले होते.

कुटुंबाला एकत्रित आणण्यासाठी आणि आई-वडिलांविषयीची भावना व्यक्त करण्यासाठी ‘सकाळ’ राबवत असलेला हा उपक्रम अतिशय चांगला आहे. सामाजिक ऐक्‍य आणि आई-वडिलांची सेवा करण्याचा संदेश संतांनी दिला आहे. हा संदेश ‘साथ चल’उपक्रमाच्या माध्यमातून पूर्ण केला जात आहे. 
- मुक्ता टिळक, महापौर

पाश्‍चिमात्य संस्कृतीच्या आचरणातून आई-वडिलांकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र, त्यांना सांभाळणे हे आपले कर्तव्य आहे. पालखी सोहळ्यात ‘सकाळ’ने राबविलेला उपक्रम  हा समाजात आदर निर्माण करणारा आहे. आई-वडीलच आपले पांडुरंग आहेत, अशी भावना या निमित्ताने समाजात निर्माण झाली.  
- डॉ. सिद्धार्थ धेंडे, उपमहापौर

आई-वडिलांच्या सन्मानार्थ पुणेकरांना एकत्र आणण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी आहे. त्यातून आपुलकीचा एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न ‘सकाळ’ने केला. हा उपक्रम पुणेकर अखंडपणे सुरू ठेवतील. 
- श्रीनाथ भिमाले, सभागृह नेता, महापालिका

आपल्या आई व वडिलांची जबाबदारी स्वीकारणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. त्याबाबत ‘सकाळ’ने एक मोठे पाऊल उचलले आहे. या ठिकाणी येऊन आनंद झाला. 
- अमितकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड

आई-वडिलांचा प्रत्येकाने मान ठेवला पाहिजे. पालखीच्या निमित्ताने पांडुरंगाला साकडे घालून आई-वडिलांना चांगले आरोग्य देण्याची प्रार्थना या उपक्रमातून करण्यात आली. हा उपक्रम स्तुत्य आहे. 
- रमेश बागवे, शहराध्यक्ष, काँग्रेस 

महापुरुषांच्या चरित्राचे अवलोकन केल्यास आपल्या लक्षात येते, की त्यांच्या उत्कर्षात आई-वडिलांच्या शिकवणुकीचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे आज आपण घेतलेल्या शपथेचे पालन करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे. 
- उपाध्याय रवींद्रमुनीजी महाराज

‘वारी पंढरीची, आई-वडिलांच्या संगोपनाची’ या संकल्पनेवर आधारित ‘सकाळ’चा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे. सर्वांनी स्वतःच्या आई-वडिलांची चांगल्या पद्धतीने सेवा केल्यास वृद्धाश्रम ही संकल्पनाच नष्ट होईल. वारकऱ्यांसाठी प्रत्येक जण आपापल्या परीने सेवा देत असतो. त्यामुळे पुढील वर्षी राजवर्धन ग्रुपतर्फे शुद्ध पाण्याची व्यवस्था केली जाईल. 
- प्रा. सीताराम बिडगर व विवेक बिडगर, संचालक, राजवर्धन ग्रुप 

पालखी सोहळ्यात मनोभावे पूजा करणारे श्रद्धाळू भाविक सहभागी होतात. यानिमित्ताने आई-वडिलांचा आदर राखणे आणि त्याची सेवा करण्याची शपथ घेण्यात आली. यामुळे वृद्धाश्रम ही संकल्पनाच संपुष्टात येईल. 
- बिशप थॉमस डाबरे, ख्रिस्ती धर्मगुरू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saath Chal Palkhi Sohala Aashadhi Wari