#saathchal हजारो भक्तांनी घेतला पुंडलिकाचा वसा 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 July 2018

आकुर्डी - पावसाच्या सरींच्या साक्षीने आकुर्डीच्या ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात आज संध्याकाळी जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने हजारोंच्या हृदयाला "साथ चल'ची साद घातली. जन्मभर आई-वडिलांची भक्त पुंडलिकाप्रमाणे सेवा करू, ही शपथ हजारो मुखातून उमटली. 

आकुर्डी - पावसाच्या सरींच्या साक्षीने आकुर्डीच्या ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात आज संध्याकाळी जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने हजारोंच्या हृदयाला "साथ चल'ची साद घातली. जन्मभर आई-वडिलांची भक्त पुंडलिकाप्रमाणे सेवा करू, ही शपथ हजारो मुखातून उमटली. 

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा येथील विठ्ठल मंदिरात सायंकाळी पोचला. टाळ-मृदंगाच्या गजरात "ज्ञानोबाऽ तुकारामऽऽ'चा जयघोष सुरू असताना पावसाच्या जोरदार सरी सुरू झाल्या. पालखी रथातून उतरवून मंदिरात नेण्यात आली. त्यानंतर समाज आरती झाली. त्यानंतर देहू संस्थानचे अध्यक्ष, सोहळा प्रमुख व विश्‍वस्तांतर्फे उपस्थित हजारो भाविकांना "आई-वडिलांच्या सेवेची' शपथ देण्यात आली. ही शपथ "आई-वडिलांचा सांभाळ' करण्याबाबतची असल्याने आम्ही ती पंढरपूरपर्यंतच्या काही मुक्कामाच्या ठिकाणी भाविकांना देऊ, असे संस्थानतर्फे सांगण्यात आले. भाविकांनी भर पावसात पालखीचे विठ्ठल मंदिरात स्वागत केले. संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास मानाचा घोडा, वीणेकरी यांच्यासह पालखी मंदिरात दाखल झाली. "सकाळ माध्यम समूह' आणि "फिनोलेक्‍स केबल्स कंपनी'तर्फे आषाढीवारीनिमित्त आयोजित "साथ चल' उपक्रमाला शहरातील नागरिक व वारकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. भर पावसात भाविकांनी "आई-वडिलांचा सांभाळ' करण्याची शपथ घेतली. अनेकांनी इमारतींवर उभे राहून सोहळा अनुभवला. 

विठ्ठल मंदिर परिसरात सकाळपासून विठू नामाचा गजर सुरू होता. शहरातील अनेक भजनी मंडळांनी मंदिरात कीर्तनाचे आयोजन केले होते. मंदिराच्या परिसराला दुपारपासूनच जत्रेचे स्वरूप आले होते. आवारात आकर्षक रांगोळी काढलेली होती. प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकाने फ्लॅस्टिकमुक्‍त वारी, झाडे लावा, प्रदूषण टाळा, प्लॅस्टिकबंदीचे फायदे या विषयांवर पथनाट्ये सादर केली. मंदिर परिसरातील कचरा विद्यार्थ्यांनी जमा केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #saathchal Sant Tukaram Maharaj Palkhi