#SaathChal भागवत पताका फडकावून ‘साथ चल’ दिंडीस प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जून 2019

सनई- चौघड्याचे मंगल सूर कानी पडले. त्यानंतर भगव्या पताका नाचवत वैष्णव आले. टाळ-मृदंगाचा गजर करीत दिंडी मागून दिंडी येऊ लागली. २५ दिंड्यांनंतर जगद्‌गुरू तुकोबारायांच्या पादुका असलेला पालखी रथ आला. ‘पुंडलिका वरदेऽ हरी विठ्ठलऽ, श्री ज्ञानदेवऽ तुकारामऽ, पंढरीनाथ महाराज की जयऽऽ’चा गजर झाला.

पिंपरी - सनई- चौघड्याचे मंगल सूर कानी पडले. त्यानंतर भगव्या पताका नाचवत वैष्णव आले. टाळ-मृदंगाचा गजर करीत दिंडी मागून दिंडी येऊ लागली. २५ दिंड्यांनंतर जगद्‌गुरू तुकोबारायांच्या पादुका असलेला पालखी रथ आला. ‘पुंडलिका वरदेऽ हरी विठ्ठलऽ, श्री ज्ञानदेवऽ तुकारामऽ, पंढरीनाथ महाराज की जयऽऽ’चा गजर झाला.

भागवत धर्माची भगवी पताका फडकावली आणि ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स कंपनी’ यांच्यातर्फे आषाढी वारीनिमित्त आयोजित ‘साथ चल’ दिंडीचा मंगळवारी (ता. २५) औपचारिक प्रारंभ झाला. ठिकाण होते पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीचे प्रवेशद्वार निगडीतील भक्ती-शक्ती चौक. 

‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या सेवेची’ या संकल्पनेवर आधारित ‘साथ चल’ दिंडीचा प्रारंभ देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख काशिनाथ महाराज मोरे, अजित महाराज मोरे, संजय महाराज मोरे यांच्या हस्ते भगवी पताका फडकावून औपचारिक उद्‌घाटन झाले. संस्थानचे विश्‍वस्त विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, माजी सोहळाप्रमुख सुनील महाराज मोरे, अशोक महाराज मोरे यांच्यासह विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. ‘साथ चल’ दिंडीला संत तुकाराम महाराज संस्थान देहू, संत ज्ञानेश्‍वर महाराज देवस्थान आळंदी आणि आकुर्डीतील विठ्ठल मंदिर विश्‍वस्तांचे सहकार्य लाभले. या उपक्रमाला विवेक बिडगर असोसिएट्‌स सह प्रायोजक आहेत.  

तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात ‘साथ चल’ दिंडी सहभागी होती. सर्वांत पुढे भगव्या पताकाधारी होते. टाळ-मृदंगांचा गजर आणि मुखाने नामस्मरण करीत देहूतील पंचम वेद वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी होते.

ज्ञानप्रबोधिनी विद्यालय, ज्ञानदीप विद्यालय व अनुसया वाढोकार उच्च माध्यमिक विद्यालय, मॉडर्न मराठी व इंग्रजी माध्यम शाळा, सरस्वती विद्यालय, म्हाळसाकांत विद्यालय, कीर्ती विद्यालय, डॉ. संदीप बाहेती यांचे ‘जगा व जगू द्या’ फाउंडेशन, पिंपरी-चिंचवड चार्टर्ड अकाउंटंट संस्था, चिंचवड पोलिस ठाण्यांतर्गत शांतता समिती, नॉव्हेल इन्स्टिट्यूट, साहित्य संवर्धन समिती यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SaathChal Wari 2019 Palkhi Sohala Aashadhi Wari Dindi