#SaathChal तुकोबांच्या पालखीने बारामती भक्तिमय

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 July 2018

बारामती शहर - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज बारामतीनगरीत भक्तिमय व उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी आज अवघी बारामती लोटली होती. 

बारामती शहर - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज बारामतीनगरीत भक्तिमय व उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी आज अवघी बारामती लोटली होती. 

बारामती शहराच्या वेशीवर बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, हायटेक टेक्‍स्टाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, मुख्याधिकारी योगेश कडुसकर, पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्यासह अनेक नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध मंडळांचे प्रमुख यांनी पालखीचे प्रथेनुसार स्वागत केले. भाविकांनी पालखीच्या आगमनानंतर दर्शनासाठी एकच गर्दी केली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

शारदा प्रांगणात पालखी सोहळ्याचा मुक्काम असून, प्रांगणात पंधरा हजार चौरस फुटांचा भव्य मंडप उभारण्यात आला आहे. विविध मंडळांच्या वतीने वारकऱ्यांची सेवा केली गेली. बारामती नगरपालिकेच्या वतीने प्रत्येक वीणेकऱ्याचा पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला. 

बारामती शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने बिस्कीट वाटप करण्यात आले. अध्यक्ष विजय सणस, उपाध्यक्ष फय्याज शेख, सचिव अप्पा घुमटकर, खजिनदार बापू गायकवाड, प्रकाश शिंदे, सहखजिनदार श्‍याम राऊत यांच्यासह विक्रेते उपस्थित होते. एन्व्हॉयर्न्मेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने पालखी सोहळ्यातील दोन हजार वारकऱ्यांना कापडी पिशवी प्रदान करण्यात आली. सुनेत्रा पवार व सहकाऱ्यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. डॉ. सचिन कोकणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी फोरमच्या वतीने वारकऱ्यांची मोफत नेत्रतपासणी केली.

पांढरीच्या महादेवाच्या मंदिराजवळ नगरसेवक अशोककाका देशमुख यांच्या हस्ते वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. विविध शाळा व महाविद्यालयांच्या वतीनेही विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बारामती तालुका मंडप मालक असोसिएशन, महात्मा फुले तरुण मंडळ, अमर धुमाळ मित्र मंडळ, बारामती सहकारी बॅंक, सिद्धी गणेश ट्रस्ट, शहर पोलिस स्टेशन, उद्धवराव इंगुले प्रतिष्ठान, बारामती मेडिकल फाउंडेशन, श्रीनिवास पतसंस्था, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन, जनकल्याण समिती, अ.भा.वि.प., काळे बंधू, महावीर पथ मित्रमंडळ, बारामती होमिओपॅथिक असोसिएशन, उपप्रादेशिक परिवहन विभाग, मराठी पत्रकार संघ, अखिल तांदूळवाडी वेस तरुण मंडळ, मोता परिवार, तुळजाभवानी मंडळ यांच्यासह अनेक संस्थांच्या वतीने वारकऱ्यांची सेवा केली गेली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal wari palkhi sant tukaram maharaj