#SaathChal पंढरीच्या वारीचा आनंद वेगळा

सागर शिंगटे
Monday, 9 July 2018

पिंपरी - ‘पंढरीच्या वारीचा आनंद वेगळाच असतो. वारकरी अत्यंत श्रद्धेने चालत असतात. त्यांच्यात स्थितप्रज्ञता दिसते. आषाढी वारी 
सर्वांना आहे त्या परिस्थितीत राहायला शिकवते. माउलींची पालखी जेथे मुक्कामी असते. त्या गावात चैतन्य पसरते’’, अशा आठवणी माजी ऑलिंपिक धावपटू बाळकृष्ण अकोटकर यांनी जागविल्या. 

पिंपरी - ‘पंढरीच्या वारीचा आनंद वेगळाच असतो. वारकरी अत्यंत श्रद्धेने चालत असतात. त्यांच्यात स्थितप्रज्ञता दिसते. आषाढी वारी 
सर्वांना आहे त्या परिस्थितीत राहायला शिकवते. माउलींची पालखी जेथे मुक्कामी असते. त्या गावात चैतन्य पसरते’’, अशा आठवणी माजी ऑलिंपिक धावपटू बाळकृष्ण अकोटकर यांनी जागविल्या. 

वर्धा जिल्ह्यातील आचार्य विनोबा भावे यांच्या पवनार आश्रमामधून महिला साधक गीताई पुस्तकाच्या प्रचार-प्रसारासाठी नेहमी पंढरीच्या वारीत जात असतात. त्यांच्यासमवेतच अकोटकर यांना पहिल्यांदा पंढरीच्या वारीला जाण्याचा योग आला. त्यानंतर त्यांनी जवळपास सात वाऱ्या केल्या. आषाढी वारीच्या निमित्ताने त्यांची भेट घेतली असता, त्यांच्या मनातील आठवणी ताज्या झाल्या. 

अकोटकर म्हणाले, ‘‘राज्यभर फिरून पवनार आश्रमाची सायकल यात्रा २००५ मध्ये निगडीतील ज्ञानप्रबोधिनीत उतरली होती. तेव्हा त्यांना भेटून येऊ असा विचार माझ्या मनात आला. महिला साधक पंढरपूरच्या यात्रेत गीताईचा प्रचार-प्रसार करत असल्याचे समजले. पंढरीची वारी कोणी सुरू केली?, त्यामागची काय कारणे असावीत? हे जाणून घेण्यासाठी गीताई प्रचारकांसमवेत माउलींच्या पालखीसोबत पहिली वारी केली. मात्र, हडपसर टाकीजवळ 

पोचलो तेव्हा पावसाला सुरवात झाली. कुठे आडोसाही नव्हता. अमाप गर्दी दिसत होती. गीताई प्रचारकही मार्गात अडकले. अंगात तापही येऊ लागला. त्यामुळे अर्ध्या वाटेतूनच घरी परतलो. दुसऱ्याच दिवशी घरी माझी प्रकृती ठीकठाक झाल्यावर आपली वारी चुकली कशी? याची खंत मनात सतत लागली होती. त्यामुळे मी सासवडला वारीत माउलींच्या पालखीसोबत सहभागी झालो. जेजुरी, वाल्हे, नीरा लोणंदमार्गे पंढरपूरला पोचलो. तेव्हा पांडुरंगाला आणि धरती मातेला नमस्कार केला. मनातील पंढरीची वारी पूर्ण करण्याची इच्छा पूर्ण झाली.’’

आमचे पुण्य हिरावू नका...
सुरवातीला अकोटकर कोणत्याही दिंडीत नसायचे. त्यामुळे दिंडीत ते जेवत असत. एकदा त्यांना एक भाविक पंगतीचे जेवण आग्रह करून वाढत होता. जेवण झाल्यावर मी त्याला पन्नास रुपये देऊ केले. तेव्हा त्याने त्याला नम्रपूर्वक नकार दिला; तसेच ‘‘माझे पुण्य हिरावून घेऊ नका’’, अशी आर्जवही केल्याची आठवणही त्यांनी सांगितली.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal Wari Palkhi Timetable 2018 Balkrishna Akotkar