#SaathChal संत जैतुनबींच्या आठवणींना उजाळा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 July 2018

पुणे - मुस्लिम समाजात जन्म घेऊन संत परंपरेचा अभ्यास करणारी.... वारी सोहळ्यात दिंडी सुरू करणारी.... महिला सबलीकरणासाठी कीर्तनाच्या माध्यमातून प्रयत्न करणारी... संत जैतुनबी. त्यांच्या आठवणींना रविवारी उजाळा मिळाला अन्‌ त्यांच्या कर्तृत्वाची गाथा पुन्हा एकदा ऐकायला मिळाली. निमित्त होते ते त्यांच्या आठव्या पुण्यस्मरणाचे. 

पुणे - मुस्लिम समाजात जन्म घेऊन संत परंपरेचा अभ्यास करणारी.... वारी सोहळ्यात दिंडी सुरू करणारी.... महिला सबलीकरणासाठी कीर्तनाच्या माध्यमातून प्रयत्न करणारी... संत जैतुनबी. त्यांच्या आठवणींना रविवारी उजाळा मिळाला अन्‌ त्यांच्या कर्तृत्वाची गाथा पुन्हा एकदा ऐकायला मिळाली. निमित्त होते ते त्यांच्या आठव्या पुण्यस्मरणाचे. 

कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या व हिंदू-मुस्लिम एकोप्याची शिकवण देणाऱ्या संत जैतुनबी तशा दुर्लक्षित राहिल्या. त्यांनी जवळपास ६० वर्षांपूर्वी सुरू केलेली दिंडी आजही मोठ्या उत्साहात आषाढी वारीत सहभागी झाली होती. विठ्ठलाच्या निस्सीम भक्त असलेल्या व ६१ वेळा पायी आषाढी वारी करणाऱ्या जैतुनबी यांचे आज आठवे पुण्यस्मरण.

त्यानिमित्ताने रविवारी विठ्ठल महाराज चौधरी यांना मरणोत्तर संतरत्न पुरस्कार जाहीर केला. ॲड. ज्ञानेश्‍वर काची यांच्या हस्ते मारुती महाराज कुऱ्हेकर यांनी त्या पुरस्काराचा स्वीकार केला. प्रबोधनाच्या संत परंपरेशी नातं सांगणारं काम करताना जैतुनबी यांनी निवडलेल्या वाटेत त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. मुस्लिम समाजाने त्यांना बहिष्कृत केले, तर काही हिंदू धर्मीयांचाही त्यांना त्रास सहन करावा लागला. अनेकदा त्यांच्यावर हल्ले करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, तरीही न डगमगता अखेरपर्यंत त्यांनी टाळ-मृदंगांची साथ सोडली नाही. जवळपास ७० वर्षे त्या समाजाला ज्ञानोबा-तुकोबांची शिकवण देत राहिल्या. जैतुनबींनी सुरू केलेली दिंडी आजही तितक्‍याच उत्साहात आषाढी वारीत सहभागी झाली होती.

जैतुनबी यांचे पुण्यातील शिष्य सुधीर खांगटे पाटील यांच्या भवानी पेठेतील घरी २०१० मध्ये निधन झाले. 

बालपणापासून कीर्तन, प्रवचने
जैतुनबी यांचा जन्म १९३० च्या दशकात बारामतीजवळील माळेगाव येथे झाला. वयाच्या सातव्या वर्षापासून त्या वडील मकबूलभाई सय्यद यांच्यासोबत हणमंतदास महाराजांची कीर्तने, प्रवचने ऐकायला जात. तेव्हापासून त्यांना कीर्तन, भजनाची गोडी लागली. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी गरीब वस्त्यांमध्ये अस्पृश्‍यता निवारणाचा संदेश दिला. येरवडा, वडारवाडी परिसरात शेकडो कीर्तनांच्या माध्यमातून दारूबंदीचं महत्त्व सांगितलं. महिला सबलीकरणासाठी कीर्तनातून साद घातली, अशी आठवण जैतुनबींचे शिष्य सुधीर खांगटे यांनी सांगितली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal Wari Palkhi Timetable 2018 Sant Jaitunabi