esakal | #SaathChal पुणेकरांचा रविवार वारकऱ्यांच्या सेवेत
sakal

बोलून बातमी शोधा

SaatChal

#SaathChal पुणेकरांचा रविवार वारकऱ्यांच्या सेवेत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरात मुक्कामी विसावलेल्या संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीसमवेत असलेल्या वारकऱ्यांच्या सेवेत पुणेकरांनी रविवारची सुटी घालवली. विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी विविध उपक्रम राबवून वारकऱ्यांची सेवा केली.

श्री शंखेश्‍वर पार्श्‍वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने भवानी पेठेत अन्नदान करण्यात आले. नगरसेविका सुलोचना कोंढरे, पालखी विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे, विष्णू नरीहर यांनी आयोजन केले होते. रोटरी क्‍लब फॉर्च्युनच्या वतीने दीपक तोष्णीवाल व सहकाऱ्यांनी कापडी पिशव्या, नॅपकिन आणि अगरबत्त्यांचे वाटप केले. बुरूडी पूल शिवसेना शाखेकडून अन्नदान, औषधे वाटप करण्यात आली. सुकांता ट्रस्टने 110 वारकरी महिलांना साडी-चोळी दिली. अखिल भारतीय मराठा महासंघाने फराळवाटप केले. साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या वतीने वारकऱ्यांना मोफत निवास, भोजन, दाढी-कटिंग आणि चप्पल दुरुस्ती सुविधा देण्यात आली. श्री सत्तावीसा जैन सिटी ग्रुपच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर, नेत्रतपासणी आणि औषधे वाटप करण्यात आली.

स्माईल्स दंतवैद्यकीय केंद्राचे डॉ. मिलिंद दर्डा यांनी मोफत दंतचिकित्सा शिबिर आयोजित केले होते. त्यामध्ये माहितीपत्रक, औषधे, टूथपेस्टचे वाटप करण्यात आले. नगरसेविका पद्मजा गोळे यांनी गुडदाणी आणि फळवाटप केले. पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या वतीने वारकऱ्यांना लाडू आणि साबुदाणा खिचडी देण्यात आली. द ग्रेट मराठा संस्था व छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने लाडू व बिस्कीट पुडे देण्यात आले. महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या वतीने मोफत नेत्रतपासणी आणि चष्मेवाटप करण्यात आले. शिवाजीनगर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीच्या वतीने वारकऱ्यांना फळवाटप करण्यात आले.

मनजितसिंग विरदी फाउंडेशनच्या वतीने फळे आणि पाण्याच्या बाटल्या वितरित करण्यात आल्या. महात्मा फुले पेठेतील जानाई मळ्यामध्ये सह्याद्री सेवा संघातर्फे नारळपाणी, अल्पोपाहार आणि अन्नदान करण्यात आले. महाराष्ट्र टेंपो संघटना व भवानी पेठ व्यापारी संघटनेच्या वतीने रेनकोट, गुडदाणी, ताट-वाट्यांचे वितरण करण्यात आले. नाना पेठेतील नीता नायकू संघटनेतर्फे मोफत दाढी-कटिंग, चप्पल-बूट-बॅग दुरुस्ती करून देण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भवानी पेठ विभागाने मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले. वुई फॉर ऑल आणि करण फाउंडेशनच्या वतीने सरबतवाटप करण्यात आले. संत सावता माळी भजनी मंडळातर्फे अन्नदान करण्यात आले.

शशिकांत म्हेत्रे मित्रपरिवाराच्या वतीने भवानी पेठेत अन्नदान करण्यात आले. स्वराज्य वैद्यकीय संघ; तसेच नारायण पेठेतील योगेश तिवारी मित्र परिवारतर्फे वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.