#SaathChal भक्तिपूर्ण वातावरणात 'सकाळ'च्या 'विठाई'चे प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 July 2018

पुणे - समतेच्या संदेशातून समाज जोडणाऱ्या वारी सोहळ्यानिमित्त "विठाई' पुस्तकाचे प्रकाशन आज येथे झाले. अभ्यासपूर्ण लेख आणि डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या छायाचित्रांचा पुस्तकात समावेश आहे.

पुणे - समतेच्या संदेशातून समाज जोडणाऱ्या वारी सोहळ्यानिमित्त "विठाई' पुस्तकाचे प्रकाशन आज येथे झाले. अभ्यासपूर्ण लेख आणि डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या छायाचित्रांचा पुस्तकात समावेश आहे.

आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यात "सकाळ'तर्फे "साथ चल' उपक्रम राबविण्यात येत आहे. हे पुस्तक या उपक्रमाचा भाग आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुखांच्या उपस्थितीत भक्तिपूर्ण वातावरणात पुस्तक प्रकाशित करण्यात आले. "सकाळ' आणि पालखी सोहळ्याच्या वर्षानुवर्षांच्या नात्याचा उल्लेख सोहळाप्रमुखांनी या वेळी आवर्जून केला.

"सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार, फिनोलेक्‍स केबल्सचे एक्‍झिक्‍युटिव्ह चेअरमन दीपक छाब्रिया, संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे सोहळाप्रमुख ऍड. विकास ढगे, विश्‍वस्त डॉ. अजित कुलकर्णी, मानकरी रामभाऊ चोपदार, संत तुकाराम महाराज पालखीचे सोहळाप्रमुख माणिक मोरे यांच्यासह पालखी सोहळ्यातील मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.

समाजातील सर्व घटकांना वारकरी संप्रदायाशी जोडण्याचे काम "सकाळ'ने केले असल्याची भावना ढगे यांनी व्यक्त केली.

छाब्रिया म्हणाले, 'समाजाला जोडण्याचे काम वारी करते. त्याच उद्देशाने "सकाळ'ने "साथ चल' उपक्रम घेतला आणि त्यामुळेच आम्ही सक्रिय सहभागी झालो.'' याप्रसंगी मोरे, चोपदार यांचीही भाषणे झाली.

पालखीत वारकरी जात-धर्म विसरून एकत्र येतात, हीच मोठी ताकद आहे. हा उत्सव जगभर पोचविण्याच्या उद्देशाने "विठाई' पुस्तक उपयुक्त ठरेल.
- प्रतापराव पवार, अध्यक्ष, सकाळ माध्यम समूह


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal Wari Palkhi Timetable 2018 Vithai Book Publish