आळंदीकरांचा माउलींना निरोप

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 June 2017

आळंदी - टाळ-मृदंगांचा निनाद... माउलीनामाचा अखंड गजर आणि भगव्या पताका उंचावत लाखो वैष्णवांचा पालखी सोहळा रविवारी सकाळी आळंदीतून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला. सोहळ्याला निरोप देण्यासाठी आळंदीकर आणि पंचक्रोशीतील भाविक थोरल्या पादुकापर्यंत आले होते. 

आळंदी - टाळ-मृदंगांचा निनाद... माउलीनामाचा अखंड गजर आणि भगव्या पताका उंचावत लाखो वैष्णवांचा पालखी सोहळा रविवारी सकाळी आळंदीतून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला. सोहळ्याला निरोप देण्यासाठी आळंदीकर आणि पंचक्रोशीतील भाविक थोरल्या पादुकापर्यंत आले होते. 

संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीने शनिवारी समाधी मंदिरातून सायंकाळी पावणेसातला प्रस्थान ठेवल्यानंतर रात्री देऊळवाड्याच्या पश्‍चिम  बाजूस नव्याने उभारलेल्या दर्शनमंडपात पालखी विसावली. शनिवारी रात्री समाजआरती झाल्यानंतर भाविकांनी पहाटे दोनपर्यंत दर्शनसाठी गर्दी केली होती. रविवारी पहाटे दोनला दर्शन बंद ठेवण्यात आले. त्यानंतर माउलींना गांधी कुटुंबीयांच्या वतीने रुद्राभिषेक आणि पाद्यपूजा करण्यात आली. देवस्थानच्या वतीने पहाटपूजा आणि आरती झाली. यानंतर ऊर्जितसिंह शितोळे आणि महादजी शितोळे सरकार यांच्या वतीने परंपरेने माउलींना पहाटे महानैवेद्य दाखविण्यात आला. महानैवद्यानंतर ठीक सहाला माउलींची पालखी देवस्थानच्या नव्या दर्शन मंडपातून बाहेर पडली. पालिका चौकात आल्यानंतर आळंदीकरांनी पालखी येथे उभ्या असलेल्या चांदीच्या रथात ठेवली. माउलींचा रथ एकेक दिंड्या पुढे निघाल्यावर साडेसहाला पालिका चौकातून पुढे मार्गस्थ झाला. पिंपरी महापालिका हद्दीत रस्ता आठपदरी असल्याने अवघ्या दीड तासातच पालखी सोहळा थोरल्या पादुका येथे आला. या ठिकाणी आरती झाल्यानंतर सोहळा पुढे पुण्याच्या दिशेने दुपारच्या जेवणासाठी फुलेनगरला मार्गस्थ झाला.

आळंदी पालिका हद्द वगळता पिंपरी महापालिका हद्दीत विश्रामगृहापासून रस्ता आठपदरी असल्याने सोहळा लवकर पुढे जात होता. 

प्रथमच रथाला दोन बैलजोड्या
सोहळ्यात प्रथमच यंदाच्या वर्षी रथाला चार बैल जुंपण्यात आले. यंदाच्या वर्षी पांडुरंग कुऱ्हाडे, नीलेश कुऱ्हाडे आणि माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर या तिघांना रथाला बैल जुंपण्याचा मान आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात आळंदी ते वेळापूर या मार्गावर कुऱ्हाडे कुटुंबीय; तर चिताळकर यांना वेळापूर ते पंढरपूर या रस्त्यावर बैल जोडी जुंपण्याचा मान आहे. यामुळे पहिल्याच दिवशी नीलेश कुऱ्हाडे आणि पांडुरंग कुऱ्हाडे या दोघांचे चार बैल रथाला जुंपलेले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sant dnyaneshwar maharaj aalandi palkhi wari