esakal | wari-2019 : तुकोबारायांची पालखी पंढरपूरकडे...
sakal

बोलून बातमी शोधा

wari-2019 : तुकोबारायांची पालखी पंढरपूरकडे...

 ‘पंढरीच्या लागा वाटे। सखा भेटे विठ्ठल।।... या भावनेने आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने सोमवारी (ता. २४) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.

wari-2019 : तुकोबारायांची पालखी पंढरपूरकडे...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देहू -  ‘पंढरीच्या लागा वाटे। सखा भेटे विठ्ठल।।... या भावनेने आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने सोमवारी (ता. २४) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. त्यासाठी राज्यभरातून वैष्णवांचा मेळा देहूत दाखल झाल्याने इंद्रायणी नदीकाठ फुलून गेला आहे. मंगळवारी (ता. २५) सकाळी अकराच्या सुमारास सोहळा आकुर्डी मुक्कामाकडे मार्गस्थ होईल. प्रस्थान सोहळ्याचे पारंपरिक कार्यक्रम पहाटे साडेचारपासून सुरू झाले. 

महाराजांच्या पादुका घोडेकर बंधूंनी (सराफ) चकाकी देऊन इनामदारवाड्यात आणल्या. दिलीप महाराज गोसावी इनामदार यांनी सपत्निक पादुकांची पूजा केली. मानकरी म्हसलेकर दिंडीतील भाविकांनी पादुका डोक्‍यावर घेऊन संबळ, टाळ-मृदंग आणि तुताऱ्या वाद्यांसह वाजतगाजत मुख्य मंदिरातील भजनी मंडपात आणल्या. दुपारी अडीच वाजता प्रस्थान सोहळा सुरू झाला. पुण्यातील (नवी पेठ) ज्येष्ठ वारकरी सदाशिव भोरेकर यांना पूजेचा मान मिळाला. नारायण अत्रे यांनी पौराहित्य केले. 

पादुकांची पूजा सुरू झाल्यानंतर मानाच्या दिंड्यांना महाद्वारातून प्रवेश दिला. मोहिते पाटील व बाभुळगावकर यांच्या अश्‍वांनी महाद्वारातून प्रवेश केला. पालखीत पादुका ठेवून देऊळवाड्यातील मंदिर प्रदक्षिणा झाली. तपोनिधी नारायण महाराज समाधिस्थळी पादुकांची भेट घडविण्यात आली. सायंकाळी पालखी इनामदारवाड्यात मुक्कामी पोचली.