Wari 2019 : पालखी मार्गावर उद्या वाहतुकीत बदल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

दापोडी उड्डाण पुलाचा वापर करावा
पालखी नाशिक फाटा चौक ते हॅरिस पुलावरून जाईपर्यंत नाशिककडे जाणाऱ्या वाहनांनी काळेवाडी फाटा, केएसबी चौक किंवा जेआरडी टाटा उड्डाण पूल मार्गाचा वापर करावा. फुगेवाडी चौक रस्ता बंद असून, पुण्याकडून पिंपरी-चिंचवड किंवा भोसरीसाठी दापोडी उड्डाण पुलाचा; तर पुणे शहरात जाण्यासाठी सांगवी किंवा काळेवाडी रस्त्याचा वापर करावा.

पिंपरी - संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बुधवारी (ता. २६) पुण्याकडे मार्गस्थ होणार असल्याने वाहतुकीत बदल केला आहे. पालखी आकुर्डीतील विठ्ठल मंदिर ते खंडोबामाळ चौकातून जाईपर्यंत निगडी जकात नाका ते खंडोबा माळदरम्यान ग्रेड सेपरेटरमधील दोन्ही बाजू व पुण्याकडील सेवारस्ता वाहतुकीसाठी आवश्‍यकतेनुसार बंद असेल. त्याऐवजी खंडोबामाळकडून प्राधिकरणाकडे जाणाऱ्या वाहनांनी एसकेएफ कंपनी रस्त्यावरून चापेकर चौक-बिजलीनगर येथून व प्राधिकरणाकडून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांनी बिजलीनगर, चापेकर चौकमार्गे महावीर चौकातून पुणे-मुंबई महामार्गावर जावे, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. 

ग्रेडसेपरेटरच्या डाव्या बाजूचा रस्ता बंद असून, पुण्याकडे जाणाऱ्यांसाठी भक्तीशक्ती चौक ते ग्रेडसेपरेटरमार्गे नाशिक फाटा रस्त्याचा वापर करावा; सेवारस्त्यावरून पुण्याकडे जाण्यासाठी प्राधिकरण-भक्तीशक्ती ते थरमॅक्‍स चौकमार्गे टेल्को रस्ता, थरमॅक्‍स चौक ते खंडोबामाळ रस्त्याऐवजी केएसबी चौक रस्त्याचा वापर करता येईल. 

भक्तीशक्ती चौक-टिळक चौक, सेवारस्ता वाहतुकीसाठी बंद असून, ग्रेडसेपरेटरमधील पुणे मार्गाचा वापर करा; निगडीसाठी बिजलीनगर चौक किंवा रावेत व डांगे चौकासाठी पर्यायी रस्त्याचा वापर करावा. दळवीनगर चौक ते एसकेएफ चौकऐवजी खंडोबामाळकडे जाण्यासाठी बिजलीनगर चौक मार्गाचा वापर करावा. 

पालखी खंडोबामाळ चौकातून नाशिक फाट्यावर येईपर्यंत चिंचवडेनगर टी-जंक्‍शन रस्ता बंद राहणार असून चिंचवडगाव, महावीर चौक, भोसरीकडे जाण्यासाठी वाल्हेकरवाडी-निगडी याचा वापर करता येईल. चिंचवडमधील लोकमान्य हॉस्पिटल चौक रस्त्याऐवजी भोसरीसाठी दळवीनगर, खंडोबामाळ चौक, थरमॅक्‍स चौक मार्गाचा वापर करावा. चिंचवडकडे जाण्यासाठी मोहननगर, केएसबी चौक, टेल्कोरोड, खंडोबामाळ किंवा निगडी मार्गाचा वापर करावा. तसेच शगुन चौकाकडील वाहनांनी डिलक्‍स चौकमार्गे लिंक रस्त्याचा, मोशी चौकातून आळंदीकडे जाणाऱ्या जड वाहनांनी मोशीतून पुणे-नाशिक रस्ता, चाकण-शिक्रापूर मार्गाने जाता येईल. नाशिक फाट्यावर नाशिककडून पुण्याकडे जाणाऱ्यांनी उड्डाण पुलावरून पिंपळे गुरवकडे व मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी कात्रज बायपास किंवा भक्तीशक्ती चौकातून निगडी, डांगे चौक रस्त्याचा वापर करावा. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्यांनी शिवाजीनगर, चतुःशृंगी, बाणेर रस्त्याने बालेवाडी किंवा औंध रस्त्याने डांगे चौक-भुमकर चौक मार्गाने जावे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sant Tukaram maharaj palkhi Sohala Aashadhi Wari Route Changes