esakal | Wari 2019 : साडेचारशेहून अधिक दिंड्या दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Dindi

कपाळी केसरी गंध, गळ्यात तुळशीच्या माळा आणि खांद्यावर भगव्या पताका घेत राज्यभरातून आलेल्या सुमारे साडेचारशेहून अधिक दिंड्यांतील लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत माउलींच्या पालखीचे प्रस्थान मंगळवारी (ता. २५) सायंकाळी होणार आहे.

Wari 2019 : साडेचारशेहून अधिक दिंड्या दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आळंदी - कपाळी केसरी गंध, गळ्यात तुळशीच्या माळा आणि खांद्यावर भगव्या पताका घेत राज्यभरातून आलेल्या सुमारे साडेचारशेहून अधिक दिंड्यांतील लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत माउलींच्या पालखीचे प्रस्थान मंगळवारी (ता. २५) सायंकाळी होणार आहे.

दुपारी बारापर्यंत माउलींचे समाधी दर्शन भाविकांना खुले ठेवण्यात येईल. दरम्यानच्या काळात सकाळी नऊपर्यंत भाविकांच्या महापूजा, वीणा मंडपात कीर्तन होईल. दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत माउलींच्या नैवेद्यासाठी दर्शनबारी बंद ठेवून समाधी मंदिराचा गाभारा स्वच्छ करून महानैवेद्य दाखविला जाईल. दुपारी दोन ते साडेतीनच्या सुमारास रथापुढील आणि रथामागील मानाच्या ४७ दिंड्यांना देऊळवाड्यात प्रवेश दिला जाईल.

दरम्यानच्या काळात गुरू हैबतबाबांच्या वतीने माउलींच्या समाधीची आरती, संस्थानच्या वतीने आरती होईल. माउलींच्या पादुका प्रस्थानासाठी पालखीत स्थानापन्न करण्यात येतील. पालखीचे वीणा मंडपातून सायंकाळी सहाच्या दरम्यान देऊळवाड्यातून पंढरीकडे प्रस्थान होईल. पालखी देऊळवाड्यातून बाहेर पडल्यानंतर नगरप्रदक्षिणा करून रात्री आजोळघरी विसावेल.

मानाच्या अश्‍वाचे आगमन
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मानाच्या अश्वांचे सोमवारी सायंकाळी आळंदीत आगमन झाले. यंदा मारवाड जातीचा, तांबूस रंगाचा नवा अश्व दाखल झाला आहे. आळंदी ते पंढरपूर प्रवासासाठी अंकलीमधून शुक्रवारी (ता. १४) शितोळे सरकार यांच्या राजवाड्यातून माउलींचा सोळा वर्षांचा मोती आणि स्वाराचा हिरा असे दोन्ही मानाचे अश्व आळंदीत पोचले आहेत.  

अंकली ते आळंदी हा सुमारे तीनशे किलोमीटरचा अकरा दिवसांचा प्रवास करून अश्व आळंदीत दाखल झाले आहेत. याशिवाय आळंदीतून माउलींच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पंढरपूरपर्यंत सुमारे अडीचशे किलोमीटरचा प्रवास हा माउलींचा आणि स्वाराचा असे दोन्ही अश्व करणार आहे. मिरज, त्यानंतर सांगलीवाडी, वहागाव, भरतगाव, भुईंज, सारोळा, शिंदेवाडीमार्गे 
अश्व रविवारी पुणे येथे मुक्कामी पोचले होते. 

दरम्यान, आळंदीत पालखी सोहळामालक बाळासाहेब आरफळकर व आळंदी देवस्थानच्या वतीने अश्वांचे स्वागत केले.