Wari 2019 : आनंदोत्सवाला वरुणराजाची साथ

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 June 2019

पंढरीच्या वाटेवर असलेला वैष्णवांचा मेळा विसावला आणि अवघी पुण्यनगरी विठ्ठलाच्या नामस्मरणाने दुमदुमली. सकाळपासूनच शहराच्या वेगवेगळ्या भागांत टाळ-मृदंगांच्या तालावरील अभंगाचे सूर गुरुवारी पुणेकरांच्या कानी पडले. पालख्यांच्या दर्शनासाठी सकाळीच पुणेकर भाविकांची पावले पालखी विठोबा आणि निवडुंगा विठोबा मंदिराच्या दिशेने वळाली. भर पावसात उभे राहून भाविकांनी पालख्यांचे दर्शन घेतले. या वातावरणामुळे पुण्यनगरीला जणू आज पंढरीचे रूप आले होते.

पुणे - पंढरीच्या वाटेवर असलेला वैष्णवांचा मेळा विसावला आणि अवघी पुण्यनगरी विठ्ठलाच्या नामस्मरणाने दुमदुमली. सकाळपासूनच शहराच्या वेगवेगळ्या भागांत टाळ-मृदंगांच्या तालावरील अभंगाचे सूर गुरुवारी पुणेकरांच्या कानी पडले. पालख्यांच्या दर्शनासाठी सकाळीच पुणेकर भाविकांची पावले पालखी विठोबा आणि निवडुंगा विठोबा मंदिराच्या दिशेने वळाली. भर पावसात उभे राहून भाविकांनी पालख्यांचे दर्शन घेतले. या वातावरणामुळे पुण्यनगरीला जणू आज पंढरीचे रूप आले होते.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात बुधवारी आगमन झाले. गुरुवारी त्यांनी पुण्यनगरीत विश्रांती घेतली. पुणेकरांनी वैष्णवाच्या मेळ्याचे पारंपरिक पद्धतीने आदरातिथ्य केले. 
सकाळपासूनच पुण्याच्या वेगवेगळ्या भागात विठ्ठलाचे नामस्मरण सुरू होते.

टाळ-मृदंगाच्या तालात अभंगाचे सूर उमटत होते. वेगवेगळ्या मंदिरांमधून कीर्तन, भजन, भक्तिगीतांचे आयोजन केले होते. यामुळे शहर परिसर संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला होता. शालेय मुलांनीही पालखीत सक्रिय सहभाग घेतला. पर्यावरणपूरक पालखीचा संदेश देत मुले वैष्णवांच्या मेळ्यात सहभागी झाली होती. स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केली. त्यातून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. 

लहान मुलेही भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन वारीत सहभागी झाली आहेत. या बालवारकऱ्यांचे फोटो अनेकांनी हौसेने आपल्या मोबाईलमध्ये क्‍लिक केले. हे फोटो सोशल मीडियावर चमकले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wari 2019 Dnyaneshwr Maharaj Tukaram maharaj Palkhi Sohala