esakal | Wari 2019 : ‘पंढरीची वारी चुकवू न दे हरी’!
sakal

बोलून बातमी शोधा

Wari

वारीसाठी दिंडी निघाली तेव्हा पाऊस नसल्यानं पेरणीही केली नव्हती. दुष्काळामुळे शेतीची कोणतीही कामे करता येत नाहीत. जनावरांना प्यायला पाणी नाही. त्यामुळे ती सुद्धा चारा छावण्यांत सोडून दिली. अशा परिस्थितीत पिकवू शकत नाही आणि खाऊ शकत नाही. अशी गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळे वारी करून पांडुरंगाला साकडं घालायला आम्ही निघालो आहोत.
- प्रभाकर निरवळ, वारकरी

Wari 2019 : ‘पंढरीची वारी चुकवू न दे हरी’!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘‘गावाकडच्या सगळ्या जमिनी भेगाळल्या आहेत. जनावरे तहानलेली तर विहिरी आटल्या आहेत. आम्ही राहायचं कसं आणि करायचं काय हा प्रश्न असताना आमच्या जगण्याचाच दुष्काळ झाला आहे. तरीही पंढरीच्या वारीत चालण्यासाठी तो पांडुरंगच शक्ती देतो. त्यामुळे वारी करून हा दुष्काळ दूर होण्यासाठी महाराष्ट्र ओलाचिंब करावा. एवढंच मागणं पांडुरंगाकडे पावलोपावली करतो आहोत,’’ असे दुष्काळी भागातील वारकरी प्रल्हाद अरगड यांनी सांगितले.

दुष्काळाच्या झळांनी भाजून निघालेल्या परभणी, जालना, बीड, हिंगोली या जिल्ह्यांतील वारकरी अभंग आणि कीर्तनात मग्न होते. परंतु, त्यांच्या मनात महाराष्ट्र हिरवागार व्हावा आणि आमची रानं सोन्यासारखी पिकावी, हेच त्यांच मागणं होतं. दुष्काळामुळे शेतीही पिकवू शकत नाही किंवा इतर कामही करू शकत नाही. परंतु कितीही दुष्काळ पडला, कितीही अस्मानी संकटे आली तरी पंढरीची वारी चुकता कामा नये. दरवर्षी होणारी पांडुरंगाची भेट व्हायलाच हवी. म्हणून दुष्काळी भागातील अनेक वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत.

आपलं मागणं मागत असतानाच वरुण राजा धो-धो बरसत होता. तेव्हा क्षणा-क्षणाला वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पंढरी गाठेपर्यंत सगळीकडे पाऊस असाच राहावा, अशी मागणी वारकऱ्यांनी केली.