esakal | Wari 2019 तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान
sakal

बोलून बातमी शोधा

Sant-Tukaram Maharaj

राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी रविवारी (ता. २३) देहूत दाखल झाले आहेत. त्यामुळे देऊळवाडा आणि इंद्रायणीचा नदीकाठ भाविकांनी फुलून गेला आहे. ग्रामस्थांनी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारल्या असून देहूनगरीत भाविकांना अन्नदानासाठी मंडपही उभारले आहेत.

Wari 2019 तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देहू - आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी (ता.२४) दुपारी अडीच वाजता देहूतील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. 

राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी रविवारी (ता. २३) देहूत दाखल झाले आहेत. त्यामुळे देऊळवाडा आणि इंद्रायणीचा नदीकाठ भाविकांनी फुलून गेला आहे. ग्रामस्थांनी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारल्या असून देहूनगरीत भाविकांना अन्नदानासाठी मंडपही उभारले आहेत.

पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे, काशिनाथ महाराज मोरे यांनी सांगितले, की आषाढी वारीसाठी पालखी सोहळा सोमवारी (ता. २४) दुपारी अडीच वाजता प्रस्थान ठेवणार आहे. 

त्यापूर्वी पहाटे साडेचार वाजता काकडा होईल. त्यानंतर पाच वाजता मुख्य देऊळवाड्यातील संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष, विश्‍वस्त आणि पालखी सोहळा प्रमुखांच्या हस्ते महापूजा होईल. पहाटे साडेपाच वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात संस्थानच्या विश्वस्तांच्या वतीने महापूजा होईल. 

सकाळी दहा वाजता भजनी मंडपात पालखी प्रस्थान सोहळ्याचे काल्याचे कीर्तन होईल.  सकाळी अकरा वाजता इनामदारवाड्यातून महाराजांच्या पादुका देऊळवाड्यात आणण्यात येतील. दुपारी अडीच वाजता देऊळवाड्यातील भजनी मंडपात पालखी सोहळा कार्यक्रमास 
प्रारंभ होईल. परंपरेनुसार वारीतील ज्येष्ठ वारकऱ्याचे हस्ते पादुकांची महापूजा होईल. 

प्रस्थान सोहळ्यानंतर सायंकाळी पाच वाजता मंदिर प्रदक्षिणा होऊन पालखी इनामदारवाड्यात मुक्कामी असेल. पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुख, मानकरी यांचा सत्कार संस्थानतर्फे करण्यात येणार आहे. संस्थानच्या वतीने सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.