esakal | Wari 2019 : अलंकापुरी माउलीमय
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदी (ता. खेड) - माउलींच्या समाधीदर्शनासाठी वारकऱ्यांनी केलेली गर्दी.

राज्यभरातून निघालेल्या हजारो वारकऱ्यांचा मेळा आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी तीन दिवसांपासून दाखल झाला आहे. इंद्रायणीत स्नानासाठी झालेल्या भाविकांच्या अलोट गर्दीने इंद्रायणीचे दोन्ही काठ फुलून गेले आहेत.

Wari 2019 : अलंकापुरी माउलीमय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आळंदी - सुखालागी जरी करिसी तळमळ,
तरी तू पंढरीशी जाय एकवेळ,
मग तू अवघाची सुखरूप होसी,
जन्मोजन्मीचे दुःख
ही भावना उरी बाळगून राज्यभरातून निघालेल्या हजारो वारकऱ्यांचा मेळा आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी तीन दिवसांपासून दाखल झाला आहे. इंद्रायणीत स्नानासाठी झालेल्या भाविकांच्या अलोट गर्दीने इंद्रायणीचे दोन्ही काठ फुलून गेले आहेत. 

गेले दोन दिवस वातावरण ढगाळ आहे. रविवारी दुपारी चारनंतर पाऊस बरसला. मावळ भागातील आंद्रा धरणातून पाणी सोडल्याने आळंदी इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे भाविकांच्या स्नानाची चांगली सोय झाली.

स्नानानंतर माउलींच्या समाधी दर्शनासाठी भक्ती सोपान पुलावर भाविक रांगेत उभे होते. दर्शनाची रांग नदीपलीकडे गेली होती. मंगळवारी माउलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा असल्याने दुपारनंतर दिंड्यांव्यतिरिक्त मंदिर परिसरात इतरांनी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रस्थानाचे थेट प्रक्षेपण वारकऱ्यांना दाखविले जाणार आहे.

ठिकठिकाणी कीर्तन प्रवचने सुरू आहेत. गोपाळपुरा, सिद्धबेट, इंद्रायणी नगर, पद्मावती रस्ता भागात भाविकांची गर्दी जास्त होती. दीड ते दोन तासांच्या अंतराने भाविकांचे समाधी दर्शन होत होते. सकाळी बारापर्यंत माउलींच्या समाधीवर अभिषेक सुरू होते. दुपारनंतर महाद्वारातील बंदोबस्त कडक केला. आळंदीतील रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.