Wari 2019 : आळंदीकरांचा निरोप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जून 2019

चैतन्यमय वातावरण
पालिका आवारात माउलींना निरोप देण्यासाठी आळंदीकर चहूबाजूंनी जमा झाले होते. माउलींचा रथ एकेक दिंड्या पुढे निघाल्यावर पालिका चौकातून पुढे मार्गस्थ झाला. शहरात नगरप्रदक्षिणा मार्गावर दिंड्या, अभंगाचे बोल, भगव्या पताका, यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. एकेक करून दिंड्या नगरप्रदक्षिणा करून शहराबाहेर पडत होत्या.

आळंदी - माउली नामाचा अखंड गजर, भगव्या पताका उंचावत लाखो वैष्णवांसह पालखी बुधवारी सकाळी आळंदीतून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. निरोप देण्यासाठी आळंदीकर आणि पंचक्रोशीतील भाविक वडमुखवाडीतील थोरल्या पादुकापर्यंत आले होते. पालखी थोरल्या पादुकापासून पुण्याकडे मार्गस्थ झाल्यावर आळंदीकरांनी माउलींना निरोप दिला.

संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीने मंगळवारी समाधी मंदिरातून रात्री सव्वासात वाजता प्रस्थान ठेवल्यानंतर रात्री देऊळवाड्याच्या पश्‍चिम  बाजूस नव्याने उभारलेल्या दर्शनमंडपात पालखी विसावली. देवस्थानच्या वतीने पहाटपूजा आणि आरती झाली. महानैवेद्यानंतर माउलींची पालखी दर्शनमंडपातून बाहेर पडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wari 2019 Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala Aashadhi Wari