esakal | Wari 2019 : माउलींच्या सहवासाचे चैतन्यदायी सुख!
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin-Bondre

उत्साही दिवेघाट
माउलींची पालखी अवघड दिवेघाट पार करून आज सासवड मुक्कामी पोचली. पावसाच्या संगतीने अवघा सोहळा चिंब झाला होता. नामस्मरणात दंग झालेले वारकरी उत्साहाने घाट चढत होते. आल्हाददायक वातावरण हेच आजच्या वाटचालीचे वैशिष्ट्य ठरले. पालखी दोन दिवस सासवड मुक्कामी असेल.

Wari 2019 : माउलींच्या सहवासाचे चैतन्यदायी सुख!

sakal_logo
By
विलास काटे

सासवड - ‘संतांच्या पालख्या निघाल्या की पाऊस येणार, हे नेहमी ऐकत आलो; पण गेल्या दोन दिवसांपासून हे चित्र प्रत्यक्षात अनुभवायला मिळाले. पावसात चिंब भिजत असताना प्रत्यक्षात चंद्रभागेच्या स्नानाची अनुभूती आली. दिवे घाटातील आल्हाददायक वातावरणात जणू माउलींच्या सहवासाचे चैतन्यदायी सुख मिळाले,’’ अशी भावना बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील सचिन बोंद्रे यांनी व्यक्त केली.   

पुण्यातील दोन दिवसांचा मुक्काम उरकून माउलींचा पालखी सोहळा सासवडच्या दिशेने मार्गस्थ झाला. दिवे घाटाच्या वाटचालीत सचिनशी संवाद साधला, ते म्हणाले की, मी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वारीत येतोय. वारीचा अनुभव दरवर्षी नवीन असतो. वारीतील संस्काराची शिदोरी घेऊन मी पुन्हा घरी जातो.

यंदा वारीत सहभागी होण्यापूर्वी संपूर्ण विदर्भ, मराठवाडा दुष्काळाने होरपळताना पाहिला. पाण्याची चिंता माउलींवर सोपवली आणि वारीसाठी मार्गस्थ झालो.

सासवडच्या दिशेने वाटचाल करत असताना आज दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे वारीतीलच नव्हे; तर गावाकडील शेतकरीही आनंदित झाला. फोनवरून कळाले की, गावाकडेही पाऊस झाला. पावसामुळे सुखा-समाधानाची दिंडी अनुभवली.