Wari 2019 : पालखी सोहळ्यास देहूकरांचा भावपूर्ण निरोप

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 June 2019

अन्नदान, औषधवाटप
पालखी मार्गावर शिरीषकुमार मित्र मंडळाने भाविकांना अन्नदान केले. रोटरी क्‍लब देहूच्या वतीने वारकऱ्यांना घोंगड्यांचे वाटप केले. माळवाडी येथे जीवनरेखा रुग्णालय आणि रोटरी क्‍लब देहूरोडच्या वतीने औषधाचे मोफत वाटप करण्यात आले. देहूरोड येथे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर पालखी निगडीकडे मार्गस्थ झाली.

देहू - टाळ-मृदंग आणि तुकाराम... तुकाराम... नामघोषात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मंगळवारी (ता. २५) सकाळी देहूतील इनामदार वाड्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पालखीचे आगमन होताच ग्रामस्थांनी कमानीवरून पुष्पवृष्टी केली. या वेळी वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर केला. 

संत तुकाराम महाराज पालखीचा पहिला मुक्काम देहूतील इनामदारवाड्यात होता. मंगळवारी (ता. २५) सकाळी परंपरेनुसार इनामदारवाड्यात शासकीय महापूजा झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पार्थ पवार, विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, नम्रता पाटील यांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची महापूजा केली.

त्यानंतर आरती झाली. या वेळी संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, दिलीप इनामदार गोसावी, सरपंच पूनम काळोखे, पंचायत समिती सभापती हेमलता काळोखे, प्रातांधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार गीता गायकवाड, गटविकास अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, जिल्हा परिषद सदस्य शैला खंडागळे उपस्थित होते. इनामदारवाड्यातून पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे दिंडी प्रमुखांना औषधांचे किट्‌स वाटले. दुपारी अनगडशाहबाबा दर्ग्याजवळ परंपरेनुसार आरती झाली.

माळवाडी येथील परंडवाल आणि बिरदवडे कुटुंबीयांकडून प्रसादाचे वाटप केले. येथील शनी मंदिरात विश्‍वस्त रमेश जाधव, दत्तात्रेय जाधव, दत्तात्रेय लांडगे यांच्या हस्ते आरती झाली. त्यानंतर पालखीचा पहिला विसावा झाला. रथाच्या पुढे २५, मागे २६५ दिंड्या या सोहळ्यात सहभागी झाल्या.

‘सर्वांना सुख मिळो, राज्यात पाऊस पडो’
‘‘संत तुकाराम महाराज वैराग्याचे प्रतीक होते. त्यांच्यासारखे वैराग्य मिळो, सर्वांना सुख, समाधान मिळो, राज्यात भरपूर पाऊस पडो, अशी मागणी संत तुकोबाराय चरणी केली आहे,’’ असे सहकारमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

संत तुकाराम पालखी सोहळ्यात मंगळवारी (ता. २५) सकाळी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय महापूजा झाली. त्या वेळी ते बोलत होते. 
पाटील म्हणाले, ‘‘राज्यात पाऊस पडावा, जेणेकरून पाण्याची पातळी वाढेल. त्यासाठी सरकारने जलयुक्त शिवार आणि इतर उपक्रम हाती घेतले आहेत. तुकोबाचरणी पाऊस पडावा, अशी मागणी केली आहे. तसेच इनामदारवाडा आणि इतर विकासकामे मार्गी लावण्यासाठी लवकरच आढावा घेईन.’’ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wari 2019 Sant Tukaram maharaj Palkhi Sohala Aashadhi Wari