Wari 2019 : वैष्णवांचा मेळा उद्योगनगरीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जून 2019

सोशल मीडियाची क्रेझ
पालखीच्या आगमनाचे फोटो काढून अनेक जण सोशल मीडियावर टाकत होते, तर काही भाविक फेसबुक लाइव्ह करीत आपल्या मित्रमंडळींना पालखीचे दर्शन घडवत होते. 

हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
उपमहापौर सचिन चिंचवडे हे सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यासाठी आले होते. मात्र, तोपर्यंत पालखी न आल्याने ते पुष्पवृष्टी करण्यासाठी देहूरोडच्या दिशेने गेले.

पिंपरी - विठुरायाच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेला वैष्णवांचा मेळा उद्योगनगरीत दाखल झाला. मुखी ‘ज्ञानोबा तुकाराम’ आणि टाळ-मृदंगाच्या गजरात जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे मंगळवारी (ता. २५) सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले. त्यानंतर निगडी मार्गे पालखी सोहळा आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात विसावला. बुधवारी (ता. २६) सकाळी पालखी पुण्याकडे मार्गस्थ होईल.

सकाळपासूनच वारकरी शहरात दाखल होण्यास सुरवात झाली. मात्र शहरवासीयांना प्रतीक्षा होती ती पालखीच्या आगमनाची. भक्‍ती-शक्‍ती उद्यानासमोर पादुकांच्या दर्शनासाठी दुपारपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कपाळी बुक्‍का, दोन्ही कानांच्या पाळ्यांना गोपीचंदन, गळ्यात तुळशी माळ, खांद्यावर भगवी पताका आणि हातातील टाळ-मृदंगांचा गजर करीत वारकऱ्यांच्या दिंड्या शहरात दाखल होऊ लागल्या. नागरिकांनी पालखीच्या स्वागतासाठी रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या. शहराकडे येणारी पालखी लांबूनच दिसू लागल्याने भक्‍तिभावात चिंब झालेल्या नागरिकांची आतुरता आणखीच वाढली.

सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास पालखीचे शहरात आगमन झाले. 
सर्वांत पुढे सनई चौघडा, त्यानंतर पालखीचे अश्‍व, पालखीच्या पुढे आणि मागे दिंड्या आणि फुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथातील महाराजांच्या पादुकांची पालखी होती. 

पालखीच्या स्वागतासाठी महापालिकेने स्वागत कक्ष उभारला होता. तुकाराम महाराजांच्या वेशात आलेल्या महापौर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, आयुक्‍त श्रावण हर्डीकर, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्यासह नगरसेवकांनी पालखीचे स्वागत आणि सारथ्य केले. नगरसेवकांनी आपल्या मानधनातून दिंडी प्रमुखांना मृदंगाची भेट दिली.

राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संघटनांचा पाहुणचार स्वीकारत पालखी आकुर्डीच्या दिशेने मुक्‍कामाच्या ठिकाणी मार्गस्थ झाली. हा नेत्रदीपक सोहळा भाविकांनी आपल्या डोळ्यांत साठवून घेतला. 

पिंपरी चिंचवडकरांनी केलेल्या स्वागताचा स्वीकार करीत पालखी सायंकाळी सात वाजता मुक्‍काम स्थळी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात पोचली. कुटे परिवाराच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. या वेळी दर्शनाकरिता भाविकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पालखीच्या स्वागताला वरुणराजानेही पुन्हा एकदा हजेरी लावली.

स्वागताला वरुणराजाचीही हजेरी
पालखीच्या आगमनापूर्वी सायंकाळी पावणेपाच वाजताच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे भक्‍तीचा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली. मात्र, वारकऱ्यांच्या उत्साहात तसूभरही फरक पडला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wari 2019 Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala Aashadhi Wari