esakal | Wari 2019 : हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक अनगडशाहबाबा दर्गा (व्हिडिओ)
sakal

बोलून बातमी शोधा

देहू - हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक अनगडशाहबाबा दर्गा व संत तुकाराम महाराज पालखी अभंग आरती स्थान.

अनगडशाहबाबा दर्गा जागृत देवस्थान आहे. हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेली तुकाराम महाराजांची पालखी तिथे थांबते. अभंग व आरती झाल्यानंतर पुढे जाते. पालखीपुढे ताशा वाजवण्याचा मान आमचा आहे.
- शब्बीर मुलाणी, भाविक, देहू

Wari 2019 : हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक अनगडशाहबाबा दर्गा (व्हिडिओ)

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी (ता. २४) देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. मंगळवारी (ता. २५) सकाळी गावालगतच्या अनगडशाहबाबा दर्ग्यापर्यंत पालखी खांद्यावर उचलून नेली जाईल. अभंग आरतीनंतर रथात पालखी ठेवून पुढे मार्गस्थ होईल. चारशे वर्षांची ही परंपरा हिंदू-मुस्लिम एकता, सलोखा, समता, बंधुभाव, ममता आणि एकात्मतेच्या पाऊलखुणांचे प्रतीक म्हणून आजही देहूत जपली जात आहे.

देहू गावालगत अनगडशाहबाबा यांचा दर्गा आहे. त्यासमोर मेघडंबरी आहे. तेच संत तुकाराम महाराज पालखी अभंग आरती स्थान. हिंदू आणि मुस्लिमांची दोन स्थानं अगदी जवळ-जवळ. 

याबाबत तुकोबारायांचे वंशज ज्येष्ठ कीर्तनकार संभाजी महाराज मोरे म्हणाले, ‘‘अनगडशाह हे अवलिया होते. त्यांना रिद्धी-सिद्धी प्राप्त होती. मात्र, तुकोबारायांना शुद्ध भक्ती मान्य होती. त्याची प्रचिती ‘चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती।...’ या अभंगात येते. आजही पालखी देहूतील इनामदारसाहेब वाड्यापासून दर्ग्यापर्यंत खांद्यावर नेली जाते. तिथे अभंग आरती होते.

त्यानंतर पालखी रथात ठेवून पंढरपूरकडे मार्गस्थ होते.’’ दिलीपबुवा गोसावी म्हणाले, ‘‘महाराजांच्या ‘अल्ला एक तू, नबी एक तू।...’, ‘अल्ला देवे अल्ला दिलावे।...’, ‘अल्ला करे सो होय बाबा करतारका सिरताज।...’ या अभंगांमधून हिंदू-मुस्लिम सलोखा, समता, बंधुभाव, ममता, एकात्मता यांच्या पाऊलखुणा दिसून येतात.’’

असा आहे दर्गा
दर्ग्याच्या गाभाऱ्यात कबर. त्यावर चादर. उर्दू लिपीत कुरआनमधील सुरती व आयती छापलेल्या. मोगरा, गुलाब, जास्वंदाच्या फुलांनी सजावट केलेली. एका भिंतीच्या देवळीत (छोटी अलमारी) २४ तास तेवणारा तेलाचा दिवा. कोपऱ्यात दोन मोरपीस. भिंतीवर चंद्र व चांदणीची प्रतिकृती. येथील नित्य पूजा ज्येष्ठ नागरिक पोपट बिरदवडे व गोविंद मुसडगे करतात. बिरदवडे म्हणाले, ‘‘दररोज सकाळी व संध्याकाळी पूजा होते. अखंड दिवा तेवत असतो. दर्गा २४ तास खुला असतो.’’ 

मुसडगे म्हणाले, ‘‘अक्षयतृतीयेस अनगडशाहबाबांचा उरूस असतो. सर्वधर्मीय भाविक सहभागी होतात. बाबा माळकरी असल्यानं मुस्लिम बांधव कुर्बानी देत नाहीत. गोडधोड पदार्थांचा नैवेद्य असतो.’’ 

भाविक सुहेल अत्तार म्हणाले, ‘‘माझे आजोबा अबुल अत्तार माळकरी होते. ते एकादशीचा उपवास करायचे. दरवर्षी आषाढी वारीला जायचे. अनगडशाहबाबांइतकीच आमची संत तुकाराम महाराजांवर श्रद्धा आहे.’’ 

(या विषयी सविस्तर वाचा आषाढी वारी विशेषांकात)