Wari 2019 : वारीमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जून 2019

वारकऱ्यांसाठी काम करण्याचे हे पहिले वर्ष आहे. पालखीच्या ‘स्वच्छ वारी स्वस्थ वारी... हरित वारी निर्मळ वारी’ यामागील उद्देशाने मी आकर्षित झाले. यातून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचे समाजकार्य करण्याची संधी मिळत आहे.
- ज्ञानेश्वरी काळे, बीए, तिसरे वर्ष

पुणे - पालखीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने ‘स्वच्छ वारी- स्वस्थ वारी, निर्मल वारी- हरित वारी’चे आयोजन केले आहे. या उपक्रमात पुणे विद्यापीठांतर्गत राज्यातील कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नगर, जळगाव या शहरांतील जवळपास साडेपाचशे एनएसएसचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या उपक्रमातून विद्यापीठातील मुले स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी पथनाट्य तसेच वारकऱ्यांची सेवा करणार असल्याची माहिती  प्रा. गोरख रूपनवर यांनी दिली.  

प्रा. रूपनवर म्हणाले, ‘‘या उपक्रमांतर्गत विद्यार्थी ‘प्लॅस्टिक पत्रावळ्या बंद’चा संदेश देणार आहेत. तसेच, पालखी मार्गावरचा कचरा उचलणे, वारीचे निर्माल्य गोळा करणे, वृद्ध वारकऱ्यांची सेवा, चुकलेल्या वारकऱ्यांना मुक्कामाच्या ठिकाणी पोचवण्याचे काम करणार आहेत.’’  

‘या उपक्रमांतर्गत पालखीच्या दोन्ही मार्गांवर वीस हजार झाडे लावणार आहेत. तसेच, वारीचा मुक्काम असलेल्या ठिकाणी वारकरी सेवेसाठी स्थानिक महाविद्यालयातील एक हजार आणि एनएसएसचे दोनशे विद्यार्थी कार्यरत राहणार आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेला आरोग्य विद्यापीठही हातभार लावत आहे. या माध्यमातून मोफत तेल आणि औषध वाटप करणार आहेत,’’ असेही ते म्हणाले.

 माझे हे तिसरे वर्ष आहे. या माध्यमातून आजची पिढी म्हणून वारकऱ्यांना प्रेरणा आणि संदेश देण्यासाठी सहभागी व्हावे असे वाटते. वारीबद्दल आकर्षण आणि लोकांमध्ये प्रबोधन करण्याची आवड असल्यामुळे वारीमार्गावरील अस्वच्छता टाळण्यासाठी आणि वारकऱ्यांना असणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी सेवाभावाच्या उद्देशाने यात सहभागी होतो.
- योगेश जाधव, एनएसएस विद्यार्थी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wari 2019 Student Involve Palkhi Sohala Aashadhi Wari