अभिमानास्पद ! बारामतीच्या सुपुत्राने राष्ट्रपती शौर्य पदका पाठोपाठ पटकाविले... 

संतोष शेंडकर
Saturday, 2 May 2020

दुहेरी मुकुट मिळवणारे ते तालुक्‍यातील पहिलेच अधिकारी

सोमेश्वरनगर (पुणे) : बारामतीचे सुपुत्र समीरसिंह द्वारकोजीराव साळवे यांना पोलिस महासंचालक पदक घोषित झाले आहे. 2018-19 मध्ये गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद विरोधी मोहीम राबवत नक्षलवाद्यांचा संपूर्ण तळ उद्‌ध्वस्त करण्याचा पराक्रम त्यांनी केला होता. या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना राष्ट्रपती शौर्य पदका पाठोपाठ आता महासंचालक पदकही मिळणार असून दुहेरी मुकुट मिळवणारे ते तालुक्‍यातील पहिलेच अधिकारी आहेत. 

आणखा वाचा- माजी मुख्यमंत्री म्हणतात, `आळंदी पॅटर्न` राज्यात राबवा

समीरसिंह साळवे हे वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील असून त्यांचे वडील द्वारकोजीराव बाजीराव साळवे हे बॅंक ऑफ बडोदाच्या सोमेश्‍वरनगर शाखेतील निवृत्त अधिकारी आहेत. समीरसिंह यांनी लोणंदमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. फर्ग्युसन महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातच 2014 मध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्यानंतर पॅकेजमागे न धावता सरकारी सेवेत जाऊन लोकाभिमुख काम करण्यासाठी 2015 मध्ये राज्यसेवेची परीक्षा दिली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा  

पहिल्याच परीक्षेत यश मिळवले आणि पोलिस उपअधीक्षक म्हणून त्यांची निवड झाली. सोलापुरात त्यांच्या सेवेस सुरुवात झाली. त्यानंतर गडचिरोली येथे रुजू झाल्यावर 2017 ते 2019 या कालावधीत त्यांनी नक्षलवादी विरोधी अभियानात प्रभावी कामगिरी बजावली. 2019 मध्ये छत्तीसगडच्या सीमेवर अबुजमाड जंगलात नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला केला होता. तब्बल 40 ते 50 नक्षलवाद्यांचा हल्ला साळवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोडून काढला. 

काही नक्षलवाद्यांचा यामध्ये एन्काऊंटरही करण्यात आला तर नक्षलवाद्यांचा अबुजमाड येथील संपूर्ण तळ उद्‌ध्वस्त करण्याचा अतुलनीय पराक्रम समीरसिंह व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला. याबद्दल त्यांच्यासह चार जणांना प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती शौर्य पदक प्रदान करण्यात आले होते. याच कामगिरीबद्दल त्यांना आता राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी पोलिस महासंचालक पदक घोषित केले आहे.

एकापाठोपाठ ही महत्त्वाची दोन्ही पदके मिळवणारे ते तालुक्‍यातील पहिलेच अधिकारी आहेत. सध्या ते नाशिक जिल्ह्यातील मनमाड तालुक्‍यात पोलिस उप अधीक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी गुन्हेगारांवर आपला वचक बसवला आहे. सोलापूर येथेही गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी प्रतिमा तयार केली होती. तालुक्‍यात या सुपुत्राचे कौतुक होत आहे. 

याबाबत द्वारकोजीराव व अलका साळवे अत्यंत आनंद व्यक्त करत म्हणाले, "अवघ्या चार-पाच वर्षात समीरने शौर्य दाखवत अत्यंत मानाची दोन पदके पटकावली आहेत. वयाच्या 29 व्या वर्षी हे भाग्य त्याला मिळाले ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:  Baramati's son won the Medal