NCP पश्चिम महाराष्ट्र सोशल मिडीया विभागाचे सरचिटणीस अजय हिंगेयांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजय हिंगे

NCP पश्चिम महाराष्ट्र सोशल मिडीया विभागाचे सरचिटणीस अजय हिंगेयांचे निधन

शिरूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र सोशल मिडीया विभागाचे सरचिटणीस अजय विजय हिंगे पाटील (वय ३५) यांचे दीर्घ आजाराने काल रात्री उशिरा निधन झाले. एका अपघातातून आलेल्या अपंगत्वामुळे गेले १७ वर्षे ते अंथरूणाला खिळून होते. मात्र, या संकटाचे संधीत रूपांतर करीत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सोशल मिडीयाचे अत्यंत प्रभावी काम केले.

अजय हिंगे यांच्या पश्चात आई - वडील, दोन भाऊ , चुलते असा परिवार आहे. न्हावरे (ता. शिरूर) येथील रहिवासी असलेले हिंगे यांना १७ वर्षांपूर्वी एका अपघातात अपंगत्व आले. त्यातून कंबरेखालील भागाच्या संवेदना हरपल्याने जागेवर पडून राहणे नशिबी आले. मात्र, त्यांनी या अपंगत्वावर मात करीत सोशल मिडीयाच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विचारांचा व विशेषतः शिरूर चे आमदार ॲड. अशोक पवार यांच्या कार्याचा प्रचार - प्रसार करण्याचे काम प्रभावीपणे केले. त्याचबरोबर समाजप्रबोधनात्मक लेख, विचार यांचाही ते वेळोवेळी प्रचार प्रसार करीत असत. गेले १७ वर्षे त्यांनी अविरत हे काम केले.

त्यांच्या या प्रभावी कामाची दखल खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी वेळोवेळी घेतली. पवार साहेबांच्या न्हावरे येथे झालेल्या सभेस उपस्थित राहण्याची अतिव इच्छा व्यक्त केल्याने अजय हिंगे यांना स्ट्रेचरवरून सभास्थानी आणण्यात आले. त्यावेळी पवारसाहेबांनी त्यांचा हात हातात घेऊन आस्थेने विचारपूस केली व तब्बेत सांभाळण्याचा सल्ला दिला. अजितदांसह सुप्रियाताई व डॉ. कोल्हे यांनी तर वेळोवेळी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची आस्थेने विचारपूस करतानाच ते करीत असलेल्या कार्याबद्दल शाबासकी दिली होती.

खासदार सुप्रिया सुळे यांनी नूकतीच त्यांना एक स्वयंचलित व्हीलचेअर भेट दिली होती. त्यातून ते बरेचसे स्वयंपूर्ण झाले होते. घराच्या परिसरात फिरणे, घरच्या शेतशिवारात फेरफटका मारणे अशा हालचाली वाढल्या होत्या. मात्र, गेल्या महिन्यात न्यूमोनिया झाल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. दोन दिवसांपासून तब्बेत आणखी ढासळल्याने त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचारादरम्यान रक्तदाब खालावला व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.