पुणे : जट निर्मूलनाची शंभरी; जिल्ह्यातील 100 महिलांची जटेच्या अंधश्रद्धेतून मुक्ती

सनिल गाडेकर
बुधवार, 10 एप्रिल 2019

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या जट निर्मूलन मोहिमेने बुधवारी शंभरी गाठली आहे. 'अंनिस'च्या जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांच्या प्रयत्नांतून सुमारे गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या जट निर्मूलन मोहिमेने बुधवारी शंभरी गाठली आहे. 'अंनिस'च्या जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांच्या प्रयत्नांतून सुमारे गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. 

भोर येथे वास्तव्यास असलेल्या जनाबाई तारू यांच्या डोक्‍यामध्ये 2 वर्षांपूर्वी गुंता झाला होता. त्यातून जट वाढत गेली. मात्र जटेबाबत त्यांच्या मनात असलेली भीती पतीच्या निधनानंतर कमी झाली. त्यामुळे त्या जट काढण्यास तयार झाल्या. जाधव यांनी राज्यातील सुमारे 108 महिलांची जटमुक्ती केली आहे. तर जिल्ह्यातील हा आकडा शंभरावर पोचला आहे.

यासंदर्भात जाधव म्हणाल्या, "जट काढली तर कुटुंबातील व्यक्तींवर वाईट प्रसंग येईल, अशी भीती तारू यांना दाखविण्यात आली. गेल्या 2 वर्षांपासून त्यांच्या केसांतील ही सुमारे अर्धा किलो वजनाची जट त्यांनी आजवर काढली नव्हती. मात्र आम्ही गेल्या काही दिवसांपासून तारू यांचे समुपदेशन करीत होतो. जट असताना देखील त्यांच्या पतीचे एका महिन्यापूर्वी निधन झाले. त्यामुळे जट आणि इतर कोणत्या बाबींचा संबंध नाही, असे त्यांना वाटू लागले. आम्ही देखील त्यांची भीती कमी केली. त्यातून त्या जट काढण्यास तयार झाल्या'. 

तारू म्हणाल्या, "ही जट देवीची आहे. ती काढू नकोस, असे मला अनेकांनी सांगितले. त्यामुळे जट काढायला मला भीती वाटायची. नंदिनी जाधव जट काढण्याचे काम करीत असल्याचे मला वृत्तपत्रांच्या माध्यमातून समजले आणि मी त्यांच्याशी संपर्क केला. अखेरीस त्यांच्या मदतीने माझी जट काढण्यात आली. आता डोकं एकदम हलके झाल्यासारखे जाणवत आहे'. माझ्याप्रमाणे इतर महिलांना देखील जट काढावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

अद्याप 500 महिलांच्या डोक्‍यावर जट 
जट निर्मूलनाच्या माध्यमातून मी गेली काही वर्षे जिल्हाभर फिरत आहे. त्यातून लक्षात येते की, अजूनही जिल्ह्यातील सुमारे 500 महिलांच्या डोक्‍यावर जट आहे. त्याबाबत त्यांना समुपदेशन देखील करण्यात आले. मात्र त्या सहजासहजी तयार होताना दिसत नाही. काहींना तर गेल्या दोन वर्षांपासून समजावून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात चांगल्या प्रकारे होत असलेले हे काम लवकरच राज्यभर मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येणार आहे, असे जाधव यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 100 years of hair tress eradication; Freedom from the superstitions of 100 women in the district