कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या बारामतीतील 11 जणांचे रिपोर्टस् समोर; सर्वच...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

बारामती कोरोनामुक्त झाल्यानंतर आपोआपच ऑरेंज झोनमध्येही बारामतीचा समावेश होऊ शकेल, त्याचा काहीसा दिलासा बारामतीकरांना मिळेल, अशी अपेक्षा आहे. 

बारामती : कोरोनाबाधित आणि रेड झोनचा शिक्का पडलेल्या बारामतीकरांसाठी आज सकाळी एक दिलासादायक बातमी आली. माळेगाव येथील ज्या कोरोनाग्रस्ताचा काल मृत्यू झाला होता, त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वच्या सर्व 11 जणांचे चाचणी अहवाल निगेटीव्ह आली आहेत. यामुळे प्रशासनानेही सुटकेचा निःश्वास सोडला आहे. सामाजिक संसर्गाची सातत्याने भीती सतावत असलेल्या प्रशासनाला या अहवालाने काहीसा दिलासा प्राप्त झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माळेगावमधील कोरोनाग्रस्ताचा पुण्यात काल (ता. 25) मृत्यू झाला. मात्र, बारामतीतून पुण्याला संबंधित रुग्णाला हलवेपर्यंत आणि पुण्यातील दवाखान्यात दाखल केल्यानंतरही तीन दिवस त्याला किडनीच्या विकाराव्यतिरिक्त इतर कोणत्याही आजाराचे लक्षण नव्हते. मात्र, नंतरच्या तपासणीत त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या 11 जणांच्या घशातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी देण्यात आले होते. आज त्यांचे अहवाल निगेटीव्ह असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, औषध दुकानातील कर्मचारी असलेल्या कोरोनाग्रस्ताचीही प्रकृती ठणठणीत असून, उद्या व परवा त्याच्या दोन चाचण्या केल्या जाणार आहेत. त्या निगेटीव्ह आल्या तर बारामती तालुका कोरोनाग्रस्त होईल. बारामतीतून नव्याने एकही रुग्ण तपासणीसाठी पाठविण्यात आलेला नसल्याने या शेवटच्या कोरोनाग्रस्ताच्या दोन चाचण्यांच्या अहवालाची आता प्रशासनाला प्रतिक्षा आहे. 

बारामती कोरोनामुक्त झाल्यानंतर आपोआपच ऑरेंज झोनमध्येही बारामतीचा समावेश होऊ शकेल, त्याचा काहीसा दिलासा बारामतीकरांना मिळेल, अशी अपेक्षा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 Peoples Corona Report Negative in Baramati