खुशखबर! पुणे विद्यापीठात प्राध्यापकांच्या जागा भरणार

खुशखबर! पुणे विद्यापीठात प्राध्यापकांच्या जागा भरणार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रखडलेल्या सहायक प्राध्यापकांच्या भरतीसाठी अखेर मुहूर्त मिळणार आहे. एका महिन्यात 111 पदांसाठी जाहिरात काढली जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. 

भाजप युती सरकारने विद्यापीठ व महाविद्यालयांमधील 80 टक्के प्राध्यापकांच्या भरतीचा निर्णय घेतला होता, त्यासाठी प्रक्रिया सुरू झाली. परंतु, सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने छोट्या संवर्गातील सुधारित बिंदुनामावलीस (रोस्टर) स्थगिती दिल्याचा आदेश काढला, त्यामुळे चार ते पाच महिन्यांपासून विद्यापीठ व महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकपदाची भरती रखडली. राज्यातील केवळ दोन अकृषी विद्यापीठांत कार्यवाही झाली. सामान्य प्रशासन विभाग आदेश मागे घेत नसल्याने नियुक्‍तीची प्रक्रिया ठप्प आहे. 

या विषयावर विद्यापीठातील बैठकीमध्ये चर्चा झाली, त्यात विद्यापीठातील 111 प्राध्यापकांची पदे लवकरच भरली जाणार आहेत, त्यासाठी एका महिन्यात जाहिरात काढून ही प्रक्रिया सुरू केली जाईल, इतर रिक्त पदांबाबतही निर्णय घेतला जाईल, अशी चर्चा झाली. दरम्यान, राज्यातील इतर विद्यापीठ व महाविद्यालयांतील सुमारे 800 प्राध्यापकांची भरती रखडली आहे. त्यांच्या तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील, तसेच यासाठी अर्थ विभागाची परवानगी आवश्‍यक असल्याने अर्थमंत्री अजित पवार यांच्या सोबत बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असे सामंत यांनी सांगितले. 

चूक लक्षात येताच सुधारणा

उदय सामंत यांचा मंत्री म्हणून पुणे विद्यापीठातला पहिलाच दौरा होता. त्या वेळी त्यांच्या अधिकृत कार्यक्रम पत्रिकेत पुणे विद्यापीठात "महाविकास आघाडी'च्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा होणार असल्याचे स्पष्ट केले.

शैक्षणिक परिसरात राजकीय बैठक होणार असल्याने त्यावरून वादंग होण्याची शक्‍यता होती. ही चूक लक्षात येताच सामंत यांच्या कार्यालयाने ही कार्यक्रम पत्रिका रद्द केली. दुसऱ्या पत्रिकेतून ही बैठक वगळली.

याबद्दल सामंत म्हणाले, ""माझ्या कार्यालयाकडून चूक झाली होती. ती लक्षात येताच विद्यापीठातील बैठक रद्द केली. पुण्यातील राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी माझी ओळख नसल्याने ही बैठक घेतली जाणार होती.'' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com