'एचए'च्या116 कामगारांनी घेतली स्वेच्छानिवृत्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020


हिंदुस्थान एंटिबायोटिक्‍स कंपनीच्या व्यवस्थापनाकडून डिसेंबर महिन्यात पहिली स्वेच्छा निवृत्ती योजना जाहीर करण्यात आली होती. त्यामधून, 250 कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. व्यवस्थापनाकडून दुसऱ्या टप्प्यात देखील स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यानुसार, 31 मार्च 2020 ला परत स्वेच्छानिवृत्ती लागू करण्यात आली. त्यामधून, 116 कामगारांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. 

पिंपरी : हिंदुस्थान एंटिबायोटिक्‍स कंपनी (एचए)च्या 116 कामगारांनी दुसऱ्या टप्प्यात स्वेच्छानिवृत्ती घेतली. या कामगारांची सर्व देणी अदा करण्यात आली आहेत. याखेरीज, कंपनीत सेवेत असलेल्या 500 कामगारांचे फेब्रुवारी 2020 पर्यंतचे थकीत वेतनही देण्यात आले आहे. 

हिंदुस्थान एंटिबायोटिक्‍स कंपनीच्या व्यवस्थापनाकडून डिसेंबर महिन्यात पहिली स्वेच्छा निवृत्ती योजना जाहीर करण्यात आली होती. त्यामधून, 250 कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. व्यवस्थापनाकडून दुसऱ्या टप्प्यात देखील स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यानुसार, 31 मार्च 2020 ला परत स्वेच्छानिवृत्ती लागू करण्यात आली. त्यामधून, 116 कामगारांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. 

कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक नीरजा सराफ म्हणाल्या,"केंद्र सरकारकडून कामगारांचे थकीत वेतन आणि स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी मंजूर 280.15 कोटी रुपये इतकी रक्कम कंपनीला कर्जस्वरुपात मिळण्याची अपेक्षा होती. त्यानुसार, कंपनीला नुकतीच ही रक्कम मिळाली. त्यानंतर, 31 मार्च 2020 ला दुसऱ्या टप्प्यातील स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर करण्यात आली. दोन्ही टप्प्यांमध्ये एकूण मिळून 366 कामगारांनी आतापर्यंत स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. कंपनीमधून दर महिन्याला 4 ते 5 कामगार सेवानिवृत्त होत आहेत. जे कामगार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनाही थकीत वेतन आणि भविष्य निर्वाह निधी (पीएफ) रक्कम देण्यात आली असून काही सेवानिवृत्त कामगारांची ग्रॅच्युटीची रक्कम देणे अद्याप बाकी आहे. तसेच कामगारांची वैद्यकीय देयके तपासली जात असून त्यानंतर त्यांची रक्कम दिली जाणार आहे.'' 

कंपनीतील सर्व प्रकल्प सध्या चालू स्थितीत आहेत. त्यामध्ये, आणखी सुधारणा करण्यासाठी व्यवस्थापनाने केंद्र सरकारकडे प्रत्येक प्रकल्पांसाठी 50 कोटी अशी एकूण 600 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यावर केंद्रीय मंत्रीमंडळाचा अजून निर्णय झालेला नाही, असेही सराफ यांनी नमूद केले. 

- "एपीआय' बनविण्याची परवानगी हवी 
देशात 57 सक्रीय औषधे घटक (ऍक्‍टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडियंटस्‌) म्हणजेच "एपीआय' बनविण्यास केंद्र सरकारकडून तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी, किमान 5 "एपीआय' तयार करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी एचए कंपनीने केली आहे. त्यावर, केंद्रीय रसायने मंत्रालयाच्या निर्णयाचीही प्रतिक्षा असल्याचे नीरजा सराफ यांनी सांगितले.
 
 "लॉकडाऊन'मुळे समस्या 
सध्याच्या "लॉकडाऊन'मुळे एचए कंपनीला पिंपरी येथील प्रकल्पामधून हॅंड सॅनिटायजर्स उत्पादन करणे अवघड झाले आहे. त्यामुळे, कंपनीच्या दिल्ली आणि मुंबई येथील प्रकल्पामधून बाजारात हॅंड सॅनिटायजर्सचा पुरवठा केला जात आहे. तसेच कंपनीला इतर उत्पादनांसाठी कच्चा माल मिळणे आणि उत्पादनांचे वितरण करण्यातही अडचणी येत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 116 worker takes voluntary retirement from HA company