​‘अनेक आक्रमणे झाली, तरी भारतीय संस्कृतीचा पाया अबाधित’

​‘अनेक आक्रमणे झाली, तरी भारतीय संस्कृतीचा पाया अबाधित’
Published on

फोटो -४४८३५
श्रीरामपूर ः ‘वंदे मातरम्’ गीताच्या समूह गायनाबद्दल महंत रामगिरी महाराज यांचा गुरुवारी सन्मानपत्र देऊन सन्मान करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदी.

शेतकऱ्यांना बारा तास मोफत वीज देणार
​देवेंद्र फडणवीस ः कर्जमाफीचा लाभ ५६ लाख शेतकऱ्यांना

सकाळ वृत्तसेवा
​श्रीरामपूर, ता. २५ : ‘‘राज्यातील साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे. एकूण ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ देण्याचे काम वेगाने सुरू आहे. दर १५ दिवसांनी पात्र लाभार्थ्यांची नवी यादी प्रसिद्ध केली जाते. ​शेतकऱ्यांची ५८ हजार कोटी रुपयांची थकीत वीजबिले माफ करण्यात आली आहेत. सध्या ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा आठ तास मोफत वीज दिली जात आहे. लवकरच शंभर टक्के शेतकऱ्यांना वर्षभर १२ तास मोफत वीज पुरवली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
सद्‍गुरु गंगागिरी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, महंत रामगिरी महाराज, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार विठ्ठल लंघे, अमोल खताळ, आशुतोष काळे, विवेक कोल्हे, रमेश बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, भानुदास मुरकुटे आदी उपस्थित होते.
युरोपसह अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये झालेल्या आक्रमणांमुळे तेथील भाषा, संस्कार आणि मूळ संस्कृती पार बदलून गेली. मात्र, हजारो वर्षांची परंपरा असलेल्या भारताची संस्कृती आणि सभ्यता जगातील सर्वांत जुनी व अखंड आहे, असे स्पष्ट करून फडणवीस म्हणाले, की या भूमीवर अनेक आक्रमणे झाली, तरी आपल्या सनातन विचारांना, संस्कारांना आणि श्रद्धेला कोणीही बदलू शकले नाही. वारकरी, गुरू-शिष्य परंपरा आणि हरिनामाच्या शक्तीमुळेच ही संस्कृती आजही ताकदीने उभी आहे.
सद्‍गुरु योगीराज गंगागिरी महाराजांनी सुरू केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या परंपरेचा उल्लेख करून फडणवीस म्हणाले की, सराला बेट या ठिकाणाहून समाजाला विचार आणि प्रेरणा मिळते. हरिनाम संकीर्तनामुळे दुःखाचे हरण होते. मनातील ‘मी’पणा दूर होतो आणि जातीभेद विसरून सर्वजण एकत्र येतात. एकमेकांमध्ये विठ्ठल पाहतात. आजच्या जगामध्ये हरिनाम संकीर्तन समाजाला एकत्र आणते आणि जीवनाला सकारात्मक दिशा देते.
विखे यांनी अखंड हरिनाम सप्ताह हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, समाजाला एकत्र आणणारा आणि जीवनाला योग्य दिशा देणारा आध्यात्मिक सोहळा आहे, असे सांगितले.


इन्फो
....
‘लाडकी बहीण योजना’ सुरूच राहील : शिंदे
​एकनाथ शिंदे यांनी सप्ताहाला अलौकिक सोहळा संबोधत, ‘गावची एकी, तर देवाची कृपा नक्की’ याचा प्रत्यक्ष प्रत्यय सराला बेटावर येतो, असे स्पष्ट केले. विरोधकांवर निशाणा साधताना ते म्हणाले की, ​कोणी कितीही आदळआपट केली, तरी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरूच राहील. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसोबत राज्य शासनाने ‘नमो शेतकरी सन्मान योजना’ सुरू केली आहे. राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार हा आपल्या बळीराजाचा आणि कष्टकऱ्यांचा आहे.

--------
इन्फो
...
सराला ​बेट राज्याचे आध्यात्मिक ऊर्जा केंद्र
​सराला बेटाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. येथे सभागृह, रस्ते, पूरसंरक्षण भिंत आणि सौरऊर्जा प्रकल्पांची कामे प्रगतिपथावर आहेत. ही सर्व कामे पूर्ण झाल्यावर सराला बेट संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक मोठे आध्यात्मिक ऊर्जा केंद्र बनेल, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
--------
​सोहळ्यातील विशेष क्षण
''वंदे मातरम्'' गीताच्या समूह गायनाबद्दल महंत रामगिरी महाराज यांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. काल्याच्या कीर्तनानंतर ‘सोनियाचा दिन आज उगवला...’ या अभंगावर उपस्थित मान्यवरांनी आणि भाविकांनी फुगडी खेळत सोहळ्याचा आनंद लुटला.
----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com