बारामतीत आता गुन्हेगारांवर राहणार नजर, कारण...

मिलिंद संगई
Thursday, 24 December 2020

शहरात 1400 खाजगी सीसीटीव्ही कॅमे-यांची गुन्हेगारांवर 24 तास नजर राहणार आहे.

बारामती : शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी आता नामी शक्कल शोधून काढली आहे. शहरात 1400 खाजगी सीसीटीव्ही कॅमे-यांची गुन्हेगारांवर 24 तास नजर राहणार आहे. सरकारी तिजोरीवर भार न टाकता राबविलेला हा प्रयोग राज्यासाठी आदर्श असा ठरु शकेल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर तंत्रज्ञानाचा वापर करुन गुन्हेगारीवर नियंत्रणाचा प्रयत्न सुरु केला. बारामतीत सोनसाखळी व मोटारसायकल चोरीचे गुन्हे जास्त घडत आहेत, ही बाब विचारात घेत गुन्हेगारांवर कँमे-यांची नजर असण्याची गरज त्यांच्या लक्षात आली. 
या नंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचा-यांना शहरातील प्रमुख रस्त्यांची जबाबदारी वाटून दिली. 

या रस्त्यावर असलेल्या ज्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, त्याची नोंद केली गेली, त्याचे रजिस्टरही आता पोलिसात तयार झाले आहे. ज्या दुकानातील कॅमेरे रस्त्याच्या दिशेने नव्हते, त्या दुकानदारांना पोलिसांनी विनंती करुन त्यांच्या कॅमे-याची दिशा रस्त्याच्या बाजूला केली. या मुळे आता बारामतीतील प्रमुख रस्ते पोलिसांच्या 24 तास नजरेखाली राहणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या पुढील काळात ज्या भागात चोरीची किंवा इतर काही घटना होईल तेव्हा पोलिस काही मिनिटातच त्याचे फूटेज मिळवू शकणार आहेत. यात विशेष म्हणजे सर्व बारामतीकरांनी पोलिसांना या साठी सहकार्य केले आहे. पोलिसांनी शहरातील ज्या दुकानदारांकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्यातील किमान एक कॅमेरा रस्त्याच्या दिशेने लावण्याचे आवाहन केले, त्याला सर्वांनीच प्रतिसाद दिला. 

कडाक्‍याच्या थंडीतही आंदोलनाची धग कायम; पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच!

दरम्यान शहरातून येणा-या व जाणा-या सर्वांवर आता सीसीटीव्हीची नजर असेल. पाटस, भिगवण, इंदापूर, मोरगाव, नीरा रस्त्यावरील टोल नाक्यांवर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून, त्याचा फायदा तपासाच्या दृष्टीने होणार आहे. 

या पुढील काळात बारामती शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 1400 खाजगी सीसीटीव्ही कॅमे-यांच्या मदतीने पोलिस गुन्हेगारांवर नजर ठेवणार आहेत. नागरिकांच्या सहकार्याने ही बाब शक्य झाली आहे. कोणताही गुन्हा केल्यानंतर या पुढील काळात गुन्हेगार कोणत्या ना कोणत्या सीसीटीव्ही कॅमे-यात निश्चित कैद होणार असल्याने त्याचा तपासाला चांगला उपयोग होईल -नामदेव शिंदे, पोलिस निरिक्षक, बारामती शहर पोलिस ठाणे.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1400 private CCTV cameras to help police in baramati