मेट्रोसाठी स्वनिधीतून १५५ कोटी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

पिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिका भवन ते निगडी या अंतरात मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी तयार केलेल्या विस्तृत प्रकल्प अहवालास गुरुवारी (ता. २०) सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. तसेच, संबंधित प्रकल्पास पुणे मेट्रोऐवजी पुणे व पिंपरी- चिंचवड मेट्रो असे नामकरण करण्याच्या प्रस्तावालाही सभेने मान्यता दिली. राज्य सरकारने निधी न दिल्यास या प्रकल्पासाठी महापालिकेच्या स्वनिधीतून १५५ कोटी रुपये देण्याची उपसूचना संमत करण्यात आली. 

महापालिका भवन ते निगडी कॉरिडॉर क्रमांक १- ए या मार्गाचा विस्तृत प्रकल्प अहवाल महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने महापालिकेकडे सादर केला आहे. या अहवालानुसार संबंधित मार्गाची लांबी ४.४१३ किलोमीटर आहे. तसेच, संबंधित मार्गावर चिंचवड स्टेशन, आकुर्डी, निगडी अशा तीन ठिकाणी मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे. संबंधित प्रकल्पाचे काम, भूसंपादन, सेवावाहिन्यांचे स्थलांतर आदींसाठी एकूण एक हजार ४८ कोटी २२ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा विस्तृत प्रकल्प अहवाल, मेट्रोच्या नावातील बदल यांना सभेने मंजुरी दिली. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी महापालिकेच्या स्व-निधीतून मेट्रो प्रकल्पासाठी १५५ कोटी रुपये देण्याची मांडलेली उपसूचना मंजूर करण्यात आली. मेट्रोसंदर्भात सदस्यांच्या मागणीनुसार संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाइन- ३ या प्रकल्पाचे पालिका हद्दीतील काम पीएमआरडीएला करू देण्यासाठी आवश्‍यक मंजुरी देण्याचा प्रस्तावदेखील सभेत संमत करण्यात आला, त्यानुसार पीएमआरडीएला पुढील कार्यवाही करणे सुलभ होणार आहे.

सोमवारी बैठक
महापालिका भवन ते निगडी या अंतरातील मेट्रोसंदर्भात माहिती मिळावी, यासाठी विरोधी पक्षनेते, गटनेते यांची एकत्रित बैठक सोमवारी (ता. २४) आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या दालनात घेण्यात येईल, असे महापौर राहुल जाधव यांनी स्पष्ट केले.

कोण काय म्हणाले...
 प्रमोद कुटे : पिंपरी महापालिका भवन ते निगडी दरम्यान काळभोरनगर येथे एक मेट्रो स्टेशन वाढवावे.
 सीमा सावळे : हिंजवडीपासून मोशीपर्यंत मेट्रोच्या नव्या मार्गाचा प्रस्ताव तयार करावा. 
 दत्ता साने : मेट्रो प्रकल्पात केंद्र, राज्य सरकार यांचा किती निधी असेल?
 सचिन चिखले : पिंपरी महापालिका भवन ते निगडी दरम्यान २०२२ पर्यंत मेट्रोच्या विस्तृत प्रकल्प अहवालानुसार कार्यवाही अपेक्षित

Web Title: 155 Crore for Metro in Self Fund Municipal