Pune News : कुत्रा चावल्याने ४ पोलिसांसह एकूण १७ जण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shri Mhasoba Mandir

दौंड शहरात श्री म्हसोबाच्या जत्रेत पिसाळलेला कुत्रा चावल्याने ४ पोलिसांसह एकूण १७ जण जखमी झाले.

Pune News : कुत्रा चावल्याने ४ पोलिसांसह एकूण १७ जण जखमी

दौंड - दौंड शहरात श्री म्हसोबाच्या जत्रेत पिसाळलेला कुत्रा चावल्याने ४ पोलिसांसह एकूण १७ जण जखमी झाले आहेत. शहरातील मोकाट गुरे आणि कुत्र्यांच्या उपद्रव वाढलेला असताना नगरपालिका प्रशासन कारवाई करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

दौंड - कुरकुंभ राष्ट्रीय महामार्गावर राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक सात येथील श्री म्हसोबा मंदिराची दोन दिवस जत्रा सुरू आहे. राज्य राखीव पोलिस दलामधील पोलिसांच्या कुटुंबीयांसह दौंड, लिंगाळी, गोपाळवाडी, गिरीम व परिसरातील भाविकांचे हे श्रध्दास्थान असल्याने दर्शनासाठी मोठी गर्दी असते. १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी एका पिसाळलेल्या कुत्र्याने दर्शनासाठी आलेल्या ०३ बालक, ०२ महिला व १२ पुरूष, असे एकूण १७ जणांचा चावा घेतला. त्यामध्ये चार पोलिसांचा समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने दौंड शहरातील उप जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दौंड उप जिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करून सर्व जखमींना टी.टी. व रॅबीपूरचे इंजेक्शन देण्यात आले. जखमींना रेबीज हा रोग जडू नये, याकरिता प्रभावी असलेल्या ‘अँटी रेबीज सिरम’ (एआरएस) हे इंजेक्शन घेण्याकरिता पुणे येथे पाठविण्यात आले. १०८ क्रमांकच्या दोन रूग्णवाहिका व राज्य राखीव पोलिस दलाची रूग्णवाहिका, अशा एकूण तीन रूग्णवाहिकांमधून जखमींना पुण्यातील डॅा. नायडू सांसर्गिक रोगांचे रूग्णालय येथे पुढील उपचारांसाठी पाठविण्यात आले, अशी माहिती रूग्णालयाचे अधीक्षक डॅा. दत्तात्रेय वाघमोडे यांनी दिली. 

जत्रेच्या निमित्ताने मंदिराच्या बाहेर नियंत्रण कक्ष असल्याने कुत्रा चावल्यानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी रवाना करण्यात आले. बंदोबस्ताकरिता एक तुकडी तैनात आहे, अशी माहिती एसआरपीएफचे पोलिस निरीक्षक सचिन डहाळे यांनी दिली.

टॅग्स :policedaundDog