खानापूरमध्ये कोरोनाचा उद्रेक; पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यासह 18 जण कोरोना..

निलेश बोरुडे
रविवार, 28 जून 2020

खानापूर (ता. हवेली) या गावामध्ये एका नामांकित पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यासह तब्बल 18 व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने ग्रामस्थांसह प्रशासनाचीही झोप उडाली आहे.

किरकटवाडी (पुणे) : खानापूर (ता. हवेली) या गावामध्ये एका नामांकित पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यासह तब्बल 18 व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने ग्रामस्थांसह प्रशासनाचीही झोप उडाली आहे. पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यासह कर्मचारी व कुटुंबातील व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने या विस्फोटाचा स्रोत नेमका कोण? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

जिजा आणि दाजी; वाचा शरद पवार यांच्या लग्नाची गोष्ट!

पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्याला त्रास होऊ लागल्याने उपचारांसाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची कोरोना तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. 'त्या'पदाधिकाऱ्याच्या घरातील इतर सात व्यक्तींचेही अहवाल पॉझिटिव्ह आले‌. त्या 'पतसंस्थेत' काम करणाऱ्या इतर काही कर्मचार्‍यांनाही ताप, खोकला अशी लक्षणे जाणवत असल्याने त्यांचेही स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातीलही 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खानापूर मधील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दोनच दिवसात 18 वर जाऊन पोचला आहे. खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांच्याकडून ही माहिती देण्यात आली. यातील एक व्यक्ती खानापूर जवळील सांबरेवाडी येथील आहे.

पुण्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतीच, आता तुम्हीच तुमचे रक्षक व्हा!

खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेतली जात असून संपर्कात आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाइन करण्यात येत आहे. पतसंस्थेचा कारभार मोठा असल्याने पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची संख्याही खूप मोठी असण्याची शक्यता असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. खानापूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून परिसरात औषध फवारणी करण्यात आली आहे; तर सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या 3 नागरिकांवर व 3 दुकानदारांवर प्रत्येकी 100 व 500 रुपये अशी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सरपंच निलेश जवळकर यांच्याकडून देण्यात आली. हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी रुग्ण आढळलेला संपूर्ण परिसर सील केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 18 affected by corona in khanapur