पुण्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतीच, आता तुम्हीच तुमचे रक्षक व्हा!

Mask-and-Han-Gloves
Mask-and-Han-Gloves

जवळ जवळ तीन महिन्यांच्या ‘लॉकडाउन’नंतर ‘अनलॉक’चे पालन आपण अधिक जबाबदारीने करू, असे अपेक्षित होते. पण, ‘कोरोना आपल्या गावीच नाही’ अशा थाटात आपण वावरत आहोत. प्रशासन काय करते? याहीपेक्षा प्रत्येक जण स्वतःच्या बचावासाठी काय करतो, हेच भविष्यात महत्त्वाचे ठरणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परिस्थिती खरोखरच हाताबाहेर जाऊ पाहत आहे. पुण्यात साडेपाच हजारांपेक्षा जास्त रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. हा आकडा छोटा मुळीच नाही. एखाद्या मोठ्या रुग्णालयाच्या बेडची संख्या अडीच ते तीनशे असते, यावरून अंदाज बांधता येईल. 

पुण्यात दररोज सव्वातीन हजारांच्या आसपास स्वॅबची तपासणी होते. यापैकी सरासरी पाचशे, साडेपाचशे जण ‘पॉझिटिव्ह’ निघत आहेत. जेव्हा त्यांच्यामध्ये लक्षणे आढळून येतात तोपर्यंत त्यांनी आणखी लोकांना संसर्ग केलेला असतो. दररोज नवनव्या भागांत रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे या रुग्णांचे ‘ट्रॅक रेकॉर्ड’ शोधणेही अवघड जात आहे.

परिणामी, पुण्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. संसर्गाची साखळी तोडणे अवघड झाले आहे. या संसर्गाला प्रशासन कोणतेही नाव देवो. पण, रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, हे आकडेवारीवरून स्पष्ट होते. हा प्रसार ‘अनलॉक’नंतर झाला, हेही ज्या भागात रुग्णसंख्या वाढत आहे, त्यावरून स्पष्ट होत आहे. म्हणजेच, नागरिक म्हणून आपण नियम पाळण्यास कमी पडत आहोत, हे स्पष्टपणे जाणवत आहे.

प्रशासन चाचण्यांची संख्या वाढवेल, तुमच्यासाठी रुग्णालय मिळेल, याची व्यवस्था करेल, मास्क वापरा, अशी सक्ती करेल, तो वापरावा, यासाठी अगदी पाचशे रुपयांचा दंडही करेल. पण, शेवटी आपली काळजी आपणच नाही घेतली, तर आपल्याला कोण वाचविणार?

‘सोशल डिस्टन्सिंग’वर प्रत्येक जण बोलतो. पण, त्याचे खरेच पालन होते का? हे पुण्यातील कोणत्याही सिग्नलवर थांबलेल्या गाड्यांच्या अंतरावरून लक्षात येईल. अगदी भाजी विक्रेत्यापासून ग्राहकांनीही साधा मास्कही नीट लावलेला नसतो, हे दररोज अनुभवतो आहोत. दुचाकीवरून तीन-तीन जण बिनधास्तपणे जातात. याचाच अर्थ आपण बेजबाबदारपणे वागून आपल्या कुटुंबाला, घरातील ज्येष्ठांना आणि पर्यायाने समाजाला अडचणीत आणत आहोत. प्रशासन येईल आणि तुम्हाला वाचवेल, ही अपेक्षा ठेवणेही चुकीचे आहे. आता परिस्थिती कितीही बिघडली तरी ‘लॉकडाउन’ नसेलच, त्यामुळे स्वतःच्या बचावासाठी स्वतःच काळजी घेणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com