मुंबईहून इंदापुरात आलेल्या मायलेकींनी...

संदेश शहा
Friday, 29 May 2020

एका कुटूंबातील दोन मायलेकी कोरोना मुक्त झाल्याने त्यांच्यावर फुलांची उधळण करत त्यांना शिरसोडी येथे घरी सोडण्यात आले.

इंदापूर (पुणे)  : तालुक्यातील शिरसोडी गावात मुंबई वरून आलेल्या एका कुटूंबातील दोन मायलेकी कोरोना मुक्त झाल्याने त्यांच्यावर फुलांची उधळण करत त्यांना शिरसोडी येथे घरी सोडण्यात आले. सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, तहसीलदार सोनालीमेटकरी, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, वैद्यकिय अधिक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सुरेखा पोळ, डॉ. कदम गुरुकुलचे अध्यक्ष डॉ. लहू कदम, वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुहास शेळके, डाॅ. विनोद राजापुरे, डॉ. अरविंद आरकिले, वृषाली नवगिरे, महादेव लोखंडे, बिजवडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच दादासाहेब काळेल यांनी त्यांच्यावर फुलांची उधळण केली तसेच टाळ्यांचा गजर करुन त्यांचे स्वागत केले.

आणखी वाचा- लाॅकडाउन वाढणार; पण...

 मुंबई येथून हे कुटुंब 14 मे रोजी आपल्या मूळगावी म्हणजे शिरसोडी येथे आले होते. त्यांचे शिरसोडी शाळेत विलगीकरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल १६ मे रोजी पाॅझिटीव्ह आला. त्यानंतर त्यांच्यावर इंदापूर नजीक डाॅ. कदम गुरुकूल मधील कोरोना केअर सेंटर मध्ये या दोन्ही रूग्णांवर आजपर्यंत उपचार सुरु होते. बारा दिवसात या रुग्णांवर कोणत्याही प्रकारची लक्षणे न आढळल्याने शुक्रवारी २९ मे रोजी त्यांना कोरोनामुक्त म्हणून घोषीत करण्यात आले. त्यानंतर त्यांना दोन रुग्णवाहिकेतून शिरसोडी येथे पाठविण्यात आले.

कुत्र्याच्या हल्ल्यात `त्याने` गमावला जीव

यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, ज्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली. ते आपल्या देशाचेच नागरिक आपले भाऊबंध, नातेवाईक आहेत. त्यामुळे त्यांना सन्मान द्या. इंदापूर आरोग्य विभागाची टीम त्यांच्यावर गेल्या बारा दिवसापासून उपचार करत होती. आज अखेर या दोन्ही रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात या टीमला यश मिळाले आहे. सर्व प्रशासनाने संघटितपणे चांगले काम केले आहे.  तालुक्यात पाच जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर दोन रुग्ण कोरोना मुक्त झाले असून दोन रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी रुग्ण कुटुंब प्रमुख म्हणाले,  डाॅ. अरविंद अरकिले यांनी वैद्यकिय अधीक्षक डाॅ. एकनाथ चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली अचूक होमीओपॅथिक औषध दिल्याने या लक्षणांवर बहात्तर तासात मात करता आली. आम्ही सर्व इंदापूर प्रशासनाचे आभारी आहोत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 person fight for corona in indapur